पर्यावरण दिनी जिल्हा परिषदेत हरित संकल्प; पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम
"वृक्ष लावणे पुरेसे नाही, त्यांचे संगोपनही तितकेच महत्त्वाचे" – अध्यक्ष दीपक वैद्य; कर्मचारी युनियनच्या पुढाकाराने कार्यक्रम उत्साहात

पर्यावरण दिनी जिल्हा परिषदेत हरित संकल्प; पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम
“वृक्ष लावणे पुरेसे नाही, त्यांचे संगोपनही तितकेच महत्त्वाचे” – अध्यक्ष दीपक वैद्य; कर्मचारी युनियनच्या पुढाकाराने कार्यक्रम उत्साहात
सोलापूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषद आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हरित संकल्पाचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, समाजकल्याण समिती सभापती संस्कृती सातपूते, महिला व बालकल्याण समिती सभापती ॲड. अमृता वाघे तसेच जिल्हा परिषद सदस्या शांभवी कल्याण शेट्टी यांच्या हस्ते प्रत्येकी एक रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष दीपक वैद्य म्हणाले, “केवळ वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण होणार नाही. लावलेल्या प्रत्येक रोपाची नियमित काळजी घेणे, त्याचे संगोपन करणे आणि त्याला वृक्षात रूपांतरित करणे ही खरी जबाबदारी आहे. पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”
उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनीही पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “वृक्ष लागवड आणि जोपासना ही आज काळाची गरज बनली आहे. यंदाच्या वर्षी वाढलेल्या तापमानाने पर्यावरणीय असंतुलनाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवडीवर भर देऊन हरित क्षेत्र वाढविण्यासाठी योगदान दिले पाहिजे.”
यावेळी सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रदीप सकट आणि इरण्णा भरडे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य संघटक शत्रुघ्न माने, जिल्हा सचिव त्रिमूर्ती राऊत, कोषाध्यक्ष संजय पाटील, मुख्य सल्लागार श्रीशैल देशमुख, पतसंस्था क्रमांक १ चे व्हाईस चेअरमन श्रीधर कलशेट्टी, कार्याध्यक्ष विशाल घोगरे, मुख्य संघटक योगेश हब्बू, संतोष शिंदे, संचालक चेतन वाघमारे, रोहित घुले, एस. डी. म्हमाणे तसेच लेखा संघटनेचे अनिल बिराजदार, विलास मसलकर आणि नागनाथ कुटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे जिल्हा परिषद परिसरात हरित वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करून पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.



