वनजमिनीवरील अतिक्रमणावर वनविभागाचा बुलडोझर; १७ एकर जमीन मोकळी, १९ जणांना न्यायालयीन कोठडी
मोहोळ वनपरिक्षेत्रातील आळजापूर येथे संयुक्त कारवाई; २० झोपड्या हटवल्या, वनमाफियांना कडक इशारा

वनजमिनीवरील अतिक्रमणावर वनविभागाचा बुलडोझर; १७ एकर जमीन मोकळी, १९ जणांना न्यायालयीन कोठडी
मोहोळ वनपरिक्षेत्रातील आळजापूर येथे संयुक्त कारवाई; २० झोपड्या हटवल्या, वनमाफियांना कडक इशारा
सोलापूर : जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आळजापूर येथील राखीव वनक्षेत्रावरील अतिक्रमणाविरोधात वनविभागाने मोठी धडक मोहीम राबवत तब्बल ७ हेक्टर (सुमारे १७ एकरांहून अधिक) शासकीय वनजमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. पोलीस व महसूल प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या कारवाईत २० झोपड्या हटविण्यात आल्या असून १९ जणांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

मोहोळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील राखीव वन गट क्रमांक १७६, १७७, १७८, १७९ आणि १८२ या भागांमध्ये शासकीय वनजमिनीवर अनधिकृत अतिक्रमण झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार सखोल नियोजन करून अत्यंत गुप्ततेने संयुक्त मोहीम आखण्यात आली.

वनविभागाच्या माहितीनुसार, राखीव वनक्षेत्रात काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे ताबा मिळवून २० झोपड्या उभारल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमित क्षेत्रातील सर्व झोपड्या हटवून संपूर्ण जमीन शासनाच्या ताब्यात घेण्यात आली.

या प्रकरणी वनजमिनीवर अनधिकृत अतिक्रमण केल्याप्रकरणी घटनास्थळावरून १५ पुरुष आणि ४ महिला अशा एकूण १९ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या संदर्भात वनरक्षक श्रीमती आयेशा पाशामियाँ शेख यांच्या फिर्यादीवरून मोहोळ वनपरिक्षेत्र कार्यालयात रॅ. गु. नं. ०५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे आणि सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे (EGS) आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती ऐश्वर्या शिंदे (CAMPA) यांनी मोहिमेचे नेतृत्व केले.

कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके (मोहोळ), राजू आटोले (माळशिरस), रोहित गांगुर्डे (सोलापूर) आणि शीला बडे (बार्शी) यांच्यासह सोलापूर वनविभागातील सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर सहभागी झाले होते. एकूण ७५ ते ८० वन कर्मचारी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

वनविभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय व राखीव वनजमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वनसंपत्तीचे संरक्षण आणि शासकीय जमिनींचे संवर्धन करण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा स्पष्ट इशारा वनविभागाने दिला आहे.



