फाईलवर सही करताना व्यस्त अध्यक्ष; नागरिकांच्या प्रश्नांना देतात प्राधान्य
जनतेच्या कामासाठी कटिबद्ध: अध्यक्ष दिलीप वैद्य दिवसभर कॅबिनमध्येच कार्यरत

फाईलवर सही करताना व्यस्त अध्यक्ष; नागरिकांच्या प्रश्नांना देतात प्राधान्य
जनतेच्या कामासाठी कटिबद्ध: अध्यक्ष दिलीप वैद्य दिवसभर कॅबिनमध्येच कार्यरत
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा परिषद चे अध्यक्ष दिलीप वैद्य हे आपल्या कामकाजाच्या पद्धतीमुळे सध्या चर्चेत आले आहेत. दररोज सकाळी साधारण अकरा वाजता कार्यालयात उपस्थित राहून ते थेट कामाला सुरुवात करतात आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या कॅबिनमध्ये बसून विविध कामांचा निपटारा करतात.
कार्यालयीन वेळेत अध्यक्ष वैद्य विविध विभागांच्या फाईल्स तपासून त्यावर तातडीने निर्णय घेत असल्याचे दिसून येते. नागरिकांची प्रलंबित कामे लवकर पूर्ण व्हावीत यासाठी ते स्वतः फाईल्सवर सही करताना आणि अधिकाऱ्यांना सूचना देताना व्यस्त असतात.

यावेळी त्यांनी नागरिक आणि पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, “मी एकदा सकाळी कार्यालयात आलो की संपूर्ण वेळ कॅबिनमध्ये राहून नागरिकांची कामे पूर्ण करण्यावर भर देतो. मला जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे कोणतेही काम असो, अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी मी पार पाडत राहणार.”
शेतकरी कुटुंबातून आलेल्या वैद्य यांनी आपल्या पार्श्वभूमीचा उल्लेख करत, सामान्य माणसांच्या अडचणींची जाणीव असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासन अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषद कार्यालयात त्यांच्या या कार्यशैलीमुळे कामाचा वेग वाढल्याचे चित्र असून, नागरिकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.



