मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुलदीप जंगम यांचा सन्मान; सोलापूरचा राज्यात डंका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुलदीप जंगम यांचा सन्मान; सोलापूरचा राज्यात डंका
मुंबई (प्रतिनिधी) :- राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रम आणि विशेष ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत सोलापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर झळकली आहे. या उल्लेखनीय यशामागे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे दूरदर्शी नेतृत्व, प्रभावी नियोजन आणि पारदर्शक प्रशासन हे मुख्य आधारस्तंभ ठरले आहेत.
या यशाबद्दल मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथील मंत्रीमंडळ सभागृहात आयोजित समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सीईओ कुलदीप जंगम यांना “उत्कृष्ट कार्यालय प्रमुख” म्हणून सन्मानित करण्यात आले. हा सोहळा शनिवार, दिनांक २८ मार्च २०२६ रोजी पार पडला.
या वेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सेवाकर्मी कार्यक्रमाच्या विविध निकषांवर सोलापूर जिल्हा परिषदेने १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. अनेक घटकांमध्ये शंभर टक्के कामगिरी करत प्रशासनाची कार्यक्षमता सिद्ध करण्यात आली.
* ज्येष्ठता सूची : ५७ पैकी सर्व संवर्गांची १००% अद्ययावत यादी (१०/१० गुण)
* पदोन्नती प्रक्रिया : ९५९ पैकी ८२० पदे भरली; उत्कृष्ट अंमलबजावणी (१०/१० गुण)
* सरळसेवा भरती : १३,००७ पैकी ११,४२५ पदे कार्यरत (१०/१० गुण)
* बिंदुनामावली प्रमाणीकरण : ५७ पैकी ५५ संवर्ग प्रमाणित (९४.७४%) (१०/१० गुण)
* अनुकंपा नियुक्ती : १६८ पदांवर १००% नियुक्ती पूर्ण (१०/१० गुण)
* iGOT प्रशिक्षण : १२,१२७ कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण; ९५.१०% कर्मचाऱ्यांनी ५ कोर्स पूर्ण (१०/१० गुण)
* सेवापुस्तक अद्ययावत : १२,१२७ पैकी १२,०३९ सेवा पुस्तके अद्ययावत (९९.२७%) (२०/२० गुण)
सीईओ कुलदीप जंगम यांनी प्रशासनात वेग, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांचा प्रभावी समन्वय साधत जिल्हा परिषदेच्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष परिणाम दिसून आले.
या उपक्रमातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सेवेत असताना मृत्यू झालेल्या १६८ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी देण्यात आली. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक व सामाजिक आधार मिळाला असून प्रशासनाची मानवी बाजू अधोरेखित झाली आहे.
ग्रामविकास विभागाच्या सेवाकर्मी कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेने इतर सर्व जिल्हा परिषदांना मागे टाकत आदर्श प्रशासनाचा नमुना निर्माण केला आहे. जंगम यांच्या नेतृत्वाखालील ही कामगिरी आता राज्यातील इतर जिल्हा परिषदांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
*सीईओ कुलदीप जंगम यांची प्रतिक्रिया*
“सेवाकर्मी कार्यक्रमात पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि प्रशिक्षणावर दिलेला भर यामुळेच हे यश शक्य झाले. हा सन्मान संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. पुढील काळातही अधिक जबाबदारीने काम करत राहू.”
एकंदरीत, सीईओ कुलदीप जंगम यांच्या कार्यक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे सोलापूर जिल्हा परिषद केवळ राज्यात प्रथम आली नाही, तर पारदर्शक, जबाबदार आणि परिणामकारक प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.



