क्राईम

“वाळू वाहतुकीसाठी 60 हजारांची मागणी; पोलिसांवरच ACB ची कारवाई”

“वाळू वाहतुकीसाठी 60 हजारांची मागणी; पोलिसांवरच ACB ची कारवाई”

बीड (प्रतिनिधी):- वाळू वाहतुकीच्या व्यवसायासाठी पोलिसांकडून लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघड झाला आहे. चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि एका पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडण्यात आले, तर प्रभारी अधिकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिपरद्वारे वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. या वाहतुकीसाठी परवानगी देण्यासाठी चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप नाना पाटील आणि उमापुर दूरक्षेत्रातील पोलीस कॉन्स्टेबल विनोद मधुकर सुरवसे यांनी ८० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. ९ मार्च २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर ACB ने पडताळणी केली असता आरोपींकडून लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.

पडताळणीदरम्यान प्रभारी अधिकारी पाटील यांनी १५ दिवसांच्या कालावधीसाठी ६० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने रक्कम कमी करण्याची विनंती केल्यानंतर ६० हजार रुपयांवर तडजोड झाली. त्यापैकी ५० हजार रुपये तात्काळ आणि उर्वरित १० हजार रुपये दोन दिवसांनी देण्याचे ठरले.
यानंतर दि. १० मार्च रोजी ACB ने सापळा रचला. तक्रारदार आणि पंच यांना उमापुर दूरक्षेत्रात पाठवण्यात आले. तेव्हा कॉन्स्टेबल सुरवसे यांनी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली.

याच वेळी पोलीस हवालदार अमोल येळे यांनी “०६ पेट्या, ०६ जिल्हा परिषद सदस्य” असा कोडवर्ड वापरून तक्रारदाराला लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचेही समोर आले. त्यानंतर ACB च्या पथकाने तात्काळ कारवाई करत सुरवसे यांना रंगेहाथ पकडून लाचेची रक्कम जप्त केली.

या प्रकरणात प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७, ७(अ) व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही सरकारी अधिकारी लाच मागत असल्यास त्वरित ACB शी संपर्क साधावा.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!