ट्रक चालकाला मारहाण प्रकरणी एसपी अतुल कुलकर्णी यांची कडक कारवाई; दोन पोलिस कर्मचारी निलंबित

ट्रक चालकाला मारहाण प्रकरणी एसपी अतुल कुलकर्णी यांची कडक कारवाई; दोन पोलिस कर्मचारी निलंबित
पंढरपूर :- पंढरपूर शहरात ट्रक चालकाला मारहाण केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही या कारवाईची चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ मार्च २०२६ रोजी पंढरपूर शहरातील मंगळवेढा नाका परिसरात वाहतूक नियमनासाठी तैनात असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी एका ट्रक चालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ व माहिती पुढे आल्यानंतर या प्रकरणाने जोर धरला.
या घटनेची दखल घेत आमदार राजू खरे आणि आमदार अभिजीत पाटील यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. चौकशीत संबंधित दोन पोलीस अंमलदारांनी कर्तव्यावर असताना बेशिस्त वर्तन केल्याचे निष्पन्न झाले.
याची गंभीर दखल घेत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधित दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे पोलिस दलात शिस्तभंगाबाबत कठोर भूमिका घेतली जात असल्याचा संदेश दिला गेला आहे.
या संदर्भात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, पोलिस दलाची प्रतिमा स्वच्छ आणि पारदर्शक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांशी वागताना पोलीस कर्मचाऱ्यांनी संयम, शिस्त आणि कायद्याच्या चौकटीचे पालन करणे आवश्यक आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा नागरिकांशी अयोग्य वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या कारवाईमुळे पोलिस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पोलिस दलात शिस्त राखण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.



