सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची बैठक 18 मार्चला
अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी दुपारी 2 वाजता होणार पहिली बैठक

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची बैठक 18 मार्चला
अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी दुपारी 2 वाजता होणार पहिली बैठक
अध्यक्षपद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’साठी आरक्षित
सोलापूर (जिमाका) :– सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बुधवार, दि. 18 मार्च 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडणार असल्याची माहिती कुमार आशीर्वाद (जिल्हाधिकारी) यांनी दिली.
राज्यातील विविध जिल्हा परिषद अध्यक्ष पदांचे आरक्षण ग्रामविकास विभागाच्या दि. 09 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन राजपत्र अधिसूचनेनुसार जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ (OBC) या गटासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. 18 मार्च 2026 पासून सुरू होणाऱ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही निवड होणार असून, जिल्हा परिषदेच्या पुढील नेतृत्वाची दिशा या बैठकीत ठरणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरण, पक्षीय रणनीती आणि संभाव्य उमेदवारांबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपद मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे विविध पक्षांतून इच्छुकांनी लॉबिंग सुरू केल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, निवडणूक प्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाईल, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात असून, पुढील अडीच वर्षांसाठी जिल्हा परिषदेचे नेतृत्व कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



