सोलापूर जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४ लाखांहून अधिक बालकांना पोलिओचा संरक्षक डोस
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत ९१.६६ टक्के उद्दिष्ट पूर्ण; उर्वरित बालकांचे गृहभेटीद्वारे लसीकरण होणार

सोलापूर जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४ लाखांहून अधिक बालकांना पोलिओचा संरक्षक डोस
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत ९१.६६ टक्के उद्दिष्ट पूर्ण; उर्वरित बालकांचे गृहभेटीद्वारे लसीकरण होणार
सोलापूर, दि. २८ जून : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सोलापूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत एका दिवसात ४ लाख २१५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस दिला आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत जिल्ह्याने ९१.६६ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून, उर्वरित बालकांचे लसीकरण पुढील काही दिवसांत गृहभेटीद्वारे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी दिली.

डॉ. कोपूरवाड यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ४ लाख ३६ हजार ५९८ अपेक्षित बालकांपैकी ४ लाख २१५ बालकांना पोलिओची लस देण्यात आली. ग्रामीण भागात ९१.६६ टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले. तर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यक्षेत्रातील शहरी भागात ४३ हजार ६६७ अपेक्षित बालकांपैकी ३७ हजार ७७१ बालकांना म्हणजे ८६.५० टक्के, तसेच सोलापूर महानगरपालिका हद्दीतील १ लाख ६ हजार ४३ अपेक्षित बालकांपैकी ९३ हजार ३४४ बालकांना म्हणजे ८८.०२ टक्के लसीकरण करण्यात आले.
मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात ५,५७०, शहरी भागात ५७० आणि महानगरपालिका क्षेत्रात ३७३ असे एकूण ६,५१३ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. या मोहिमेसाठी ७,२२२ आरोग्य कर्मचारी कार्यरत होते. याशिवाय वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरीय पर्यवेक्षकांनी मोहिमेवर बारकाईने देखरेख ठेवली.
एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी बसस्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा, विटभट्ट्या, साखर कारखाने, यात्रा, लग्नसमारंभ आदी गर्दीच्या ठिकाणी विशेष लसीकरण केंद्रे उभारण्यात आली होती. तसेच भटक्या समाजाच्या वस्त्या आणि ऊसतोड कामगारांच्या तात्पुरत्या वसाहतींमध्ये मोबाईल पथकांमार्फत लसीकरण करण्यात आले.
मोहिमेपूर्वी वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, आरोग्य विभागाच्या जनजागृती उपक्रमांद्वारे तसेच आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या घरभेटींद्वारे पालकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली. यामुळे मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि जिल्ह्याने ९१.६६ टक्के उद्दिष्ट गाठले.
उर्वरित बालकांचे लसीकरण ग्रामीण भागात पुढील तीन दिवस गृहभेटीद्वारे, तर शहरी भागात पाच दिवस विशेष गृहभेटी (आय.पी.पी.आय.) घेऊन पूर्ण करण्यात येईल. कोणतेही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी व्यक्त केला.



