सोलापूर

‘सोलापूर पॅटर्न’ आता राज्यभर; जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांना १ कोटींच्या विमा सुरक्षा कवचाची घोषणा

सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून कौतुक; ९८ केंद्रप्रमुखांना पदस्थापना आदेशांचे वितरण

‘सोलापूर पॅटर्न’ आता राज्यभर; जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांना १ कोटींच्या विमा सुरक्षा कवचाची घोषणा

सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून कौतुक; ९८ केंद्रप्रमुखांना पदस्थापना आदेशांचे वितरण

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राबविलेल्या १ कोटी रुपयांच्या सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच योजनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, हा ‘सोलापूर पॅटर्न’ आता राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये राबविण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. यासोबतच जिल्हा परिषदेने ९८ शिक्षकांना केंद्रप्रमुख पदस्थापनेचे आदेश देत शैक्षणिक प्रशासनाला गती दिल्याबद्दलही त्यांनी विशेष कौतुक केले.

 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात केंद्रप्रमुख पदस्थापना आदेशांचे वितरण तसेच जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियासोबत करण्यात आलेल्या सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच कराराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने दहा हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा देणारी अभिनव योजना राबवून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. या योजनेच्या धर्तीवर ग्रामविकास विभागांतर्गत कार्यरत सर्व जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयांचे सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेतला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयांपर्यंतचे जीवन व अपघात विमा संरक्षण, अपघातात अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार कमाल ८० लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत, अपत्यांच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य तसेच एका अपत्याच्या उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंतची मदत अशा विविध सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या ९८ केंद्रप्रमुख पदस्थापना प्रक्रियेचेही पालकमंत्री गोरे यांनी विशेष कौतुक केले. राज्यभरातून केंद्रप्रमुखांची पदे भरण्याबाबत निवेदने येत असताना सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करून पात्र शिक्षकांना पदस्थापना आदेश दिले आहेत. याबद्दल शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, शिक्षणाधिकारी कादर शेख तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी सॅलरी पॅकेज योजनेची माहिती देताना सांगितले की, या कराराचा लाभ जिल्हा परिषदेच्या १० हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. अशा प्रकारचा करार करणारी सोलापूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली असून, या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयांचे विमा संरक्षण आणि विविध बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड, कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक आनंदकुमार काटकर, मुख्य व्यवस्थापक अनिकेत शिवडेकर, ट्रेझरी शाखेचे व्यवस्थापक अतुल मगदुम, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी शशीकिरण उबाळे, लेखाधिकारी मिरगळे तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीनाक्षी वाकडे व कादर शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!