जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना नव्या वाहनांचे वितरण; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते १३ वाहनांच्या चाव्यांचे वाटप
हिंदू धर्मपरंपरेनुसार वाहनांचे पूजन; जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यासाठी नवी वाहने
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना नव्या वाहनांचे वितरण; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते १३ वाहनांच्या चाव्यांचे वाटप
हिंदू धर्मपरंपरेनुसार वाहनांचे पूजन; जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यासाठी नवी वाहने
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विकासकामांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून खरेदी करण्यात आलेल्या १३ नव्या वाहनांचा ताफा रविवारी पदाधिकाऱ्यांच्या सेवेत दाखल झाला. महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वाहनांचे हिंदू धर्मपरंपरेनुसार विधिवत पूजन करून चाव्यांचे वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकारी निवडून आल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती आणि पंचायत समिती सभापतींसाठी नवीन वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी वापरात असलेली वाहने जुनी झाल्याने तसेच निर्धारित कालावधीपेक्षा अधिक काळ वापरली गेल्यामुळे नव्या वाहनांची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली होती. वाहन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नव्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व वाहनांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, तसेच विषय समिती सभापती चेतनसिंह केदार सावंत रामाप्पा चिवडशेट्टी, अमृता वाघे आणि विविध पंचायत समिती सभापतींना वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

नव्या वाहनांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी महिंद्रा एक्सयूव्ही ७००, विषय समिती सभापतींसाठी महिंद्रा स्कॉर्पिओ, तर पंचायत समिती सभापतींसाठी महिंद्रा बोलेरो वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी सुमारे अंदाजे १५ लाख रुपयांपर्यंत, तर सभापतींसाठी १२ लाख रुपयांपर्यंतच्या किमतीची वाहने खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार वाहनांची खरेदी करण्यात आली.

जिल्ह्यातील विकासकामांची पाहणी, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा, ग्रामपंचायतींना भेटी, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, आपत्कालीन परिस्थितीतील दौरे तसेच आषाढी वारी, पावसाळी आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा आणि ग्रामीण रस्त्यांच्या कामांवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सातत्याने जिल्हाभर प्रवास करावा लागतो. नव्या वाहनांमुळे हे काम अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने पार पाडणे शक्य होणार आहे.

या कार्यक्रमाला शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे , प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कपूर वाड , कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे व जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, विविध विभागांचे पदाधिकारी तसेच पंचायत समितीचे सभापती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या वाहनांच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचे दौरे अधिक प्रभावी होणार असून, ग्रामीण विकासकामांच्या अंमलबजावणीला गती मिळण्याबरोबरच जनतेच्या समस्या तत्काळ सोडविण्यासही मदत होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.



