जागतिक महिला दिनानिमित्त ठोकळ प्रशालेत ‘निर्मल नारी सन्मान 2026’ पुरस्कारांचे भव्य वितरण

जागतिक महिला दिनानिमित्त ठोकळ प्रशालेत ‘निर्मल नारी सन्मान 2026’ पुरस्कारांचे भव्य वितरण
सोलापूर :- जागतिक महिला दिनानिमित्त इंदिरा ज्ञानवर्धिनी, सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर येथे ‘निर्मल नारी सन्मान 2026’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात व थाटामाटात पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांसह माता पालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री. दिलीपराव माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या विद्यमान उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सोलापूर सौ. स्मिता नडीमेटला, नगरसेविका सौ. अश्विनी चव्हाण तसेच सहायक पोलीस निरीक्षक सौ. स्वरांजली खामकर उपस्थित होत्या. यावेळी इंदिरा ज्ञानवर्धिनी संस्थेचे सचिव श्री. भिकाजी गाजरे, व्याख्याते व निवृत्त प्राध्यापक डॉ. भीमाशंकर बिराजदार आणि प्राचार्य श्री. डी. डी. गाजरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्त्रीशक्तीच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागतगीताच्या माध्यमातून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना तसेच माता पालकांना ‘निर्मल नारी सन्मान 2026’ पुरस्काराने गौरविण्यात आले. माता पालकांमध्ये सौ. चंद्रभागा भडंगे, सिताबाई आदलिंगे, जिजाबाई पाटणकर, कस्तुरबाई कांबळे, सप्पव्वा कट्टीमनी, रुक्मिणी काळे व तनुजा गुंड यांचा समावेश होता. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. सारिका होमकर, सौ. नंदिनी जानकर, सौ. ललिता बडे आणि कु. ज्ञानेश्वरी भोसले यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना नगरसेविका सौ. अश्विनी चव्हाण यांनी महिलांचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षातील 365 दिवस झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांनी माता पालकांचा सन्मान करणारी ठोकळ प्रशाला ही आदर्श शाळा असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. सारिका होमकर यांनी महिलांनी कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना स्वतःच्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष देऊन वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार श्री. दिलीपराव माने यांनी आपल्या भाषणात महिलांनी आज शिक्षण, प्रशासन, सामाजिक व इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली असून त्या कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे सांगितले. त्यांनी सर्व उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
या कार्यक्रमाला सुमारे 600 हून अधिक महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर उपस्थित माता पालकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य श्री. डी. डी. गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूनम चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. गायकवाड व्ही. एस. यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष अॅड. श्री. विपीन ठोकळ, उपाध्यक्ष श्री. सचिन ठोकळ, संचालिका सौ. शिल्पाताई ठोकळ तसेच सचिव श्री. भिकाजी गाजरे यांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाबद्दल शाळेचे अभिनंदन केले.



