मैंदर्गीत भाजपचा गुलालोत्सव; १८ जागांवर भाजपचा कब्जा, अंजली बाजारमठ नगराध्यक्षपदी विजयी
मैंदर्गीत भाजपचा गुलालोत्सव; १८ जागांवर भाजपचा कब्जा, अंजली बाजारमठ नगराध्यक्षपदी विजयी
अक्कलकोट (प्रतिनिधी):- मैंदर्गी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करत नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार अंजली बाजारमठ यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले. या निकालानंतर मैंदर्गी शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गुलाल उधळून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

नगरपरिषदेच्या एकूण सदस्यसंख्येत भाजपचे १८ उमेदवार विजयी झाले असून, २ स्थानिक आघाडीच्या उमेदवारांनी देखील यश संपादन केले आहे. बहुमताच्या जोरावर भाजपने नगरपरिषदेत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. निकाल जाहीर होताच शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. “भाजपचा विजय असो” अशा घोषणा देत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.
या विजयाचे श्रेय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला, प्रचारातील शिस्तबद्ध नियोजनाला तसेच स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर केलेल्या प्रभावी मांडणीला दिले जात आहे. अंजली बाजारमठ यांच्या विजयामुळे मैंदर्गी नगरपरिषदेत आता भाजपचे नेतृत्व अधिक बळकट झाले असून आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विजयानंतर बोलताना भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांचे आभार मानत स्वच्छ प्रशासन, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते व मूलभूत सोयी-सुविधांवर भर देण्याचे आश्वासन दिले. मैंदर्गी नगरपरिषदेतील हा निकाल सोलापूर जिल्ह्यातील राजकीय चित्रावर भाजपच्या वाढत्या प्रभावाचे द्योतक मानला जात आहे.



