१२ फेब्रुवारीला जिल्हा परिषद पुनमगेट येथे कर्मचारी शिक्षकांचा धरणे सत्याग्रह
१२ फेब्रुवारीला जिल्हा परिषद पुनमगेट येथे कर्मचारी शिक्षकांचा धरणे सत्याग्रह
सोलापूर (प्रतिनिधी ):- देशातील ११ प्रमुख कामगार संघटना व अखिल भारतीय राज्य सहकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला असून या संपाला सरकारी-निमसरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर, नगर परिषद-नगर पंचायत कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा शाखा सोलापूर यांनी सक्रिय पाठींबा जाहीर केला आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषद पुनमगेट येथे सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.
देशातील सुमारे ५ कोटी कामगार-कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ४ कामगार संहिता रद्द करा, पी.एफ.आर.डी.ए. कायदा रद्द करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करा, ८ व्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेचा आढावा घ्या, रिक्त पदे तात्काळ भरा, सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस विमा योजना लागू करा अशा महत्त्वाच्या मागण्यांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा संप करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सुमारे १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समन्वय समितीची आभासी सभा ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली. या बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन देशव्यापी संपाला प्रातिनिधिक स्वरूपात सक्रिय पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यस्तरावरील मागण्यांमध्ये सुधारित पेन्शन योजना १ मार्च २०२४ पासून लागू करण्याची घोषणा झाली असली तरी त्यासंबंधीचे नियम व कार्यपद्धती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. लिपिक ते तृतीय श्रेणी वरिष्ठ पदांपर्यंत वेतन त्रुटींचा प्रश्न मा. खुल्लर समितीने अभ्यासला असून सदर अहवाल प्रसिद्ध करून वेतनत्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच खाजगीकरण व कंत्राटीकरण थांबवावे, १० वर्षांपेक्षा जास्त सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे, चतुर्थश्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी उठवावी, सर्वांना व्यापक कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करावी, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करावे, नोव्हेंबर २००५ पूर्वीची सेवा गृहीत धरून जुनी पेन्शन योजना लागू करावी, १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय नगर परिषद व नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सचिव पातळीवर चर्चासत्र आयोजित करावे, सरकारी कर्मचाऱ्यांवरील वाढते हिंसक हल्ले रोखण्यासाठी आयपीसी कलम ३५३ अजामीनपात्र करावे अशा एकूण १८ प्रलंबित मागण्यांची सनद शासनाकडे प्रलंबित असल्याचे समन्वय समितीने नमूद केले आहे.
दरम्यान, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे जिल्हा शाखेची बैठक पार पडली. या बैठकीत १२ फेब्रुवारी रोजी धरणे सत्याग्रह आंदोलन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीस मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजीव साळुंके, मार्गदर्शक श्री. अशोक इंदापूरे, सरचिटणीस श्री. अमृत कोकाटे, उपाध्यक्ष श्री. शंतनू गायकवाड, कार्याध्यक्ष श्री. गजानन गायकवाड, उपाध्यक्ष श्री. खंडू भोसले, सहसचिव श्री. दिपक पुजारी, सहसचिव श्री. ज्ञानेश्वर पवार, सहसचिव श्री. दशरथ बनसोडे, सहसचिव श्री. अल्ताफ हुसेन हिरोळकर, संघटक श्री. किशोर सावळे, श्री. बालाजी रेड्डी, श्री. मारयप्पा फंदीलोलू (माजी अध्यक्ष, जलसंपदा) व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





