मुख्यमंत्र्यांकडून उत्कृष्ट जिल्हा परिषद सीईओंचा होणार गौरव; सुशासनाच्या स्पर्धेत सोलापूर चमकला

मुख्यमंत्र्यांकडून उत्कृष्ट जिल्हा परिषद सीईओंचा होणार गौरव; सुशासनाच्या स्पर्धेत सोलापूर चमकला
मुंबई (प्रतिनिधी ):- विकसित महाराष्ट्र २०४७ च्या दिशेने पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासन साध्य करण्यासाठी राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमाचा निकाल जाहीर झाला असून, राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये सोलापूर जिल्हा परिषद ठळकपणे चमकली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरसह पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, हिंगोली, ठाणे आणि जळगाव जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या या यशामागे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या प्रभावी नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रशासनिक सूत्रांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व निकषांवर नियोजनबद्ध, पारदर्शक आणि परिणामकारक कामगिरी नोंदवली.
राज्य शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम राबविला होता. या उपक्रमात प्रशासनातील कार्यक्षमता व उत्तरदायित्व वाढवण्यावर भर देण्यात आला. मूल्यमापन करताना आस्थापनाचा आकृतिबंध, सेवाप्रवेश नियम, ज्येष्ठता सूची, पदोन्नती स्थिती, सरळसेवा भरती, बिंदूनामावली, अनुकंपा भरती, iGOT नोंदणी व प्रशिक्षण तसेच कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके अद्ययावत करणे अशा एकूण ९ घटकांचा सखोल आढावा घेण्यात आला.
या निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध संस्था, महामंडळे, स्वायत्त संस्था, महानगरपालिका व नगर परिषद यांचे गुणांकन २६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाले होते. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवण्यात आलेल्या जिल्हा परिषद कार्यालयांचा निकाल आज अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला आहे.
*सोलापूर जिल्हा परिषद ठरली विशेष आकर्षण*
सीईओ कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने सेवाविषयक नोंदी अद्ययावत करणे, पदोन्नती प्रक्रिया गतीमान करणे, प्रशिक्षण व्यवस्थापन, भरती प्रक्रिया व प्रशासनिक पारदर्शकता या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद राज्यातील अव्वल ठरली आहे.
या यशामुळे जिल्ह्यातील प्रशासनिक कामकाजाला नवी गती मिळाली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली आहे. राज्य शासनाकडून सर्व विजेत्या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या चमूंचा लवकरच विशेष गौरव करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.




