बाळे पुलावर नेमकं काय घडलं? सोलापुरातील ‘मामा’ काळाच्या पडद्याआड
बाळे पुलावर नेमकं काय घडलं? सोलापुरातील ‘मामा’ काळाच्या पडद्याआड
सोलापूर (प्रबुद्ध राज न्यूज) :- सोलापुरातून एक अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक बातमी समोर आली असून, ज्येष्ठ पत्रकार बळीराम सर्वगोड (मामा) यांचे शुक्रवारी रात्री अपघाती निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील पत्रकार बांधव, प्रशासकीय यंत्रणा आणि त्यांच्या परिचितांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.
या घटनेची अधिकृत माहिती त्यांचे चिरंजीव शुभम सर्वगोड यांनी दिली आहे.
मयत बळीराम सर्वगोड हे दैनिक सुराज्यमध्ये कार्यरत होते. नेहमीप्रमाणे काम आटोपून रात्री साडेनऊच्या सुमारास ते उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथील आपल्या गावी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

प्राप्त माहितीनुसार, ते एम.एच. 13 डी.एक्स. 7931 क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीवरून जात असताना बाळे पुलावर पाठीमागून आलेल्या एम.एच. 13 सी.जी. 3015 क्रमांकाच्या होंडा स्कुटीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेनंतर स्कुटीचालकाने वाहन घटनास्थळी सोडून पळ काढल्याची माहिती आहे.

या जोरदार धडकेमुळे बळीराम सर्वगोड यांची दुचाकी पुलावरील डिव्हायडरला जाऊन धडकली. यात डोक्याला गंभीर मार लागून ते गंभीर जखमी झाले. तात्काळ मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.
अपघातानंतर त्यांचा मृतदेह सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून, तेथे नातेवाईक, मित्रपरिवार आणि पत्रकारांची मोठी गर्दी झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर बीबी दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्याची वेळ दुपारनंतर जाहीर केली जाणार आहे.
बळीराम सर्वगोड यांनी गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सोलापुरात पत्रकारिता केली. त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दैनिक केसरीमधून केली होती. त्यानंतर अनेक वर्षे ते दैनिक सुराज्यशी जोडले गेले. अभ्यासू, शांत, मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांमध्ये ‘मामा’ या नावाने परिचित होते.
पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून समाजासाठीची जबाबदारी आहे, या भावनेतून त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
त्यांच्या अपघाती निधनाने सोलापूरची पत्रकारिता एका अनुभवी, मार्गदर्शक आणि माणुसकी जपणाऱ्या पत्रकाराला मुकली आहे. सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
मामा यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🕯️



