राजकारण

मोहोळमध्ये ढाब्यावर ‘ईव्हीएम’ सापडल्याने खळबळ ! सत्य काय निघाले समोर?

मोहोळमध्ये ढाब्यावर ‘ईव्हीएम’ सापडल्याने खळबळ ! सत्य काय निघाले समोर?

मोहोळ (प्रतिनिधी):- मोहोळ शहरात काल रात्री एका ढाब्यावर ईव्हीएम मशीन आढळल्याची घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संशय आणि चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, या प्रकरणाबाबत महसूल उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

महसूल उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले की, ढाब्यावर ईव्हीएम मशीन आढळल्याची घटना सत्य असून ती गंभीर आणि दुर्दैवी आहे. मात्र नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून, त्या मशीन अतिरिक्त (रिझर्व्ह) होत्या आणि त्या प्रत्यक्ष मतदानासाठी वापरण्यात आलेल्या नव्हत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाच्या माहितीनुसार, निवडणूक व्यवस्थापनासाठी झोनल अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त दोन ईव्हीएम मशीन राखीव स्वरूपात ठेवण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित अधिकारी आणि वाहन चालक यांच्यात योग्य समन्वय व संवाद न झाल्यामुळे या मशीन चुकीच्या ठिकाणी — ढाब्यावर — ठेवण्यात आल्याचा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या त्या सर्व अतिरिक्त मशीन सुरक्षितपणे स्ट्रॉंग रूममध्ये स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आल्या असून त्यांची नोंद व तपासणी पूर्ण करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असले तरी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!