राजकारण

कुंभारीत ‘नोटांचा खेळ’ उघड? मतदार खरेदीप्रकरणी तक्रारीने राजकीय वर्तुळात खळबळ

कुंभारीत ‘नोटांचा खेळ’ उघड? मतदार खरेदीप्रकरणी तक्रारीने राजकीय वर्तुळात खळबळ

सोलापूर (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर कुंभारी परिसरात मतदारांना पैसे व प्रलोभने वाटप केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) — माकप — यांनी निवडणूक आचारसंहिता कक्षाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.

 

माकपचे जिल्हा समिती सदस्य व निवडणूक प्रमुख कॉ. बापू राजाराम साबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कुंभारी गण क्रमांक 115 व जिल्हा परिषद गट क्रमांक 58 अंतर्गत गोदूताई परुळेकर नगर परिसरात काही व्यक्तींनी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैसे व इतर प्रलोभने देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत भाजपचे उमेदवार सुरज पाटील व त्यांचे कार्यकर्ते सोम करपे यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.

सदर प्रकार कुंभारी 4 नंबर वॉर्डातील श्री. माळी यांच्या निवासस्थानी रात्री सुमारे 8:08 वाजता घडल्याचा दावा करण्यात आला असून, माकपचे कार्यकर्ते आप्पाशा चांगले यांनी संबंधितांना रंगेहाथ पकडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणात आदर्श आचारसंहितेचा तसेच लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 123 (1) व 123 (2) चा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 170 व 171 च्या विरोधात हे कृत्य असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मुक्त, निष्पक्ष आणि निर्भय निवडणूक प्रक्रियेवर अशा प्रकारांचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असे नमूद करत सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माकपकडून करण्यात आली आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि भयमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.

या तक्रार प्रक्रियेसाठी आप्पाशा चांगले, ॲड. अनिल वासम, ॲड. शाम आडम यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे माकपकडून सांगण्यात आले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!