सोलापूर

५४ मीटर रस्ता व ब्रिजच्या कामात गती देण्याचे निर्देश — वाहतुकीत अडथळा नको : आयुक्त, डॉ सचिन ओंबासे

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज विभागीय कार्यालय क्रमांक ६च्या हद्दीत सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. शहरातील रस्ते, सार्वजनिक सोयीसुविधा आणि सुरू असलेले विकास प्रकल्प निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सतत देखरेख केली जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दमाणी नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करताना आयुक्तांनी स्वच्छता व्यवस्था, लाइटिंग, पाणीपुरवठा आणि देखभाल कामांबद्दल समाधान व्यक्त केले. थोबडे वस्ती येथील शौचालयात काही सुविधा अपूर्ण असल्याचे निदर्शनास येताच तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

५४ मीटर रस्ता आणि ५४ रस्ता-ब्रिज परिसरातील सुरू असलेल्या रोड व बांधकाम कामांचीही पाहणी करण्यात आली. वाहतुकीत अडथळा येऊ नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांची पाहणी करताना आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी कंत्राटदारांना ३० डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. परिसर अधिक आकर्षक, स्वच्छ आणि व्यवस्थित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रत्येक घटकाची तपासणी करण्यात आली.

एजीबेशन सेंटरसमोरील महापालिकेच्या वर्किंग वुमेन्स हॉस्टेलच्या जागेची तसेच रूपा भवानी मंदिराच्या मागील बाजूस प्रस्तावित भक्त निवास प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचे नियोजन, प्रगती आणि तांत्रिक माहिती घेऊन नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

या पाहणी दौऱ्यात नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, विभागीय अधिकारी जावेद पानगल, प्रकाश दिवाणजी, प्रकाश सावंत, मनोज जाधव, सागर खरोसेकार आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या सर्व कामांची सातत्याने तपासणी होत असून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी सांगितले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!