पंढरपूर – मंगळवेढा रस्त्यावर भीषण अपघात; चार भाविकांचा मृत्यू, सहा गंभीर जखमी

पंढरपूर – मंगळवेढा रस्त्यावर भीषण अपघात; चार भाविकांचा मृत्यू, सहा गंभीर जखमी
पंढरपूर (प्रतिनिधी):- देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावर शरदनगरजवळ आज सकाळी घडली. कंटेनर आणि क्रुझर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन चार भाविकांचा जागीच मृत्यू, तर सहा जण गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरातील रहिवासी असलेले हे भाविक तुळजापूर व अक्कलकोट येथे देवदर्शन करून परतीच्या मार्गावर होते. हे सर्वजण ठाण्यातील एका खाजगी कंपनीतील कर्मचारी असून सुट्टीचा लाभ घेत कुटुंबीयांसह सहलीसाठी आले होते. मात्र आनंदाचा हा प्रवास क्षणातच शोकांतिकेत बदलला.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गंभीर जखमी झालेल्या सहा जणांना तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

विशेष बाब म्हणजे हे सर्व भाविक आज रात्री साडेनऊ वाजता पंढरपूरहून मुंबईकडे रेल्वेने रवाना होणार होते. मात्र रेल्वेचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच हा दुर्दैवी अपघात घडल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर काही काळ पंढरपूर–मंगळवेढा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही मदत केली.
सध्या पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून कंटेनर चालकाची चौकशी केली जात आहे. दरम्यान, या भीषण अपघातामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकमय वातावरण आहे.


