“३० कोटी कामगार रस्त्यावर उतरणार? गुरुवारी ‘भारत बंद’चा इशारा; जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता”
“३० कोटी कामगार रस्त्यावर उतरणार? गुरुवारी ‘भारत बंद’चा इशारा; जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता”
नवी दिल्ली :- देशातील १० प्रमुख कामगार संघटनांनी गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली असून केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यांविरोधात हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात सुमारे ३० कोटींपेक्षा अधिक कामगार सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून देशभरात मोठा परिणाम जाणवू शकतो.
कामगार संघटनांचे म्हणणे आहे की, नव्या कामगार कायद्यांमुळे कामगारांचे हक्क कमी होणार असून रोजगार असुरक्षित होण्याची भीती आहे. याविरोधात संघटनांनी एकत्र येत देशव्यापी बंदची घोषणा केली आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असल्याने आंदोलनाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये वाहतूक, उद्योग, बँकिंग, विमा, पोस्टल सेवा तसेच सार्वजनिक क्षेत्रातील विविध कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नागरिकांनी गुरुवारी घराबाहेर पडण्यापूर्वी स्थानिक परिस्थितीची माहिती घ्यावी, आवश्यक कामे आधीच पूर्ण करून ठेवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, ‘भारत बंद’ला नेमका किती प्रतिसाद मिळतो आणि जनजीवनावर त्याचा किती परिणाम होतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.




