निशब्द सभागृह, ओलावलेले डोळे; जिल्हा परिषदेत स्व.अजितदादा पवारांना श्रद्धांजली

निशब्द सभागृह, ओलावलेले डोळे; जिल्हा परिषदेत स्व.अजितदादा पवारांना श्रद्धांजली
सोलापूर (प्रतिनिधी):- स्व.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यासह सोलापूर जिल्हा परिषदेतही शोककळा पसरली होती. स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी सोलापूर जिल्हा परिषदेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, तर सभागृहात हळहळ व्यक्त होत होती.
श्रद्धांजली सभेच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहात उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मौन पाळत स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या शोकसभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता (बांधकाम) संतोष कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यकाळातील निर्णय, प्रशासकीय अनुभव आणि जनतेशी असलेली नाळ याबद्दल उपस्थितांनी भावना व्यक्त केल्या. संपूर्ण सभागृहात शोकमय वातावरण होते.
या श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.




