पावसाळ्यातील जलसंकटाला पूर्णविराम? सोलापूरसाठी ७४ नाल्यांचा मास्टर प्लॅन मंजूर

पावसाळ्यातील जलसंकटाला पूर्णविराम? सोलापूरसाठी ७४ नाल्यांचा मास्टर प्लॅन मंजूर
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहरात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने सोलापूर महानगरपालिकेने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शहरातील ७४ नाल्यांचा समावेश असलेल्या पर्जन्यजल नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनाच्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंजुरी दिली आहे.
सन २०१८, २०२० आणि २०२५ मध्ये शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते. पावसाचे पाणी वेळेत न वाहणे, नैसर्गिक प्रवाहांमध्ये अडथळे, तसेच नाल्यांवरील अतिक्रमण यामुळे ही समस्या अधिक तीव्र होत गेली होती.

या समस्येचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करण्यासाठी गुगल सॅटेलाईट इमेज, ड्रोन सर्वेक्षण, टोपोशीट आणि टोटल स्टेशन सर्वेक्षण वापरून शहराच्या १७८ चौ.कि.मी. क्षेत्राचा अभ्यास करण्यात आला. यामधून शहरातील पावसाळी पाण्याचे ७४ प्रमुख नाले निश्चित करण्यात आले असून, त्यांना ६ जलसंधारण बेसिनमध्ये विभागण्यात आले आहे. या नाल्यांची एकूण लांबी ११५.७७ किलोमीटर इतकी आहे.
दि. १९ जानेवारी २०२५ रोजी आयुक्तांच्या आदेशानुसार पूर नियंत्रण सर्व्हेक्षण पथकाची स्थापना करण्यात आली.या पथकाने प्रत्यक्ष स्थळभेटी देऊन नाल्यांचे संरेखन, अतिक्रमणे, नैसर्गिक प्रवाहातील बदल, घरांची स्थिती, महसूल नोंदी व बांधकाम परवानग्यांचा सखोल अभ्यास करून सविस्तर तांत्रिक अहवाल तयार केला.

या आराखड्यात पुढील उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत –
नाल्यांची नियमित सफाई व गाळ काढणे
अतिक्रमणे व अनधिकृत भराव हटवून नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करणे
गरजेनुसार नाल्यांची रुंदी व खोली वाढवणे
गर्दीच्या भागात भूमिगत नाले उभारणे
बॉक्स कल्व्हर्ट, क्रॉस ड्रेनेज, पूल व रस्त्यालगतचे चर विकसित करणे
नगररचना विभागाच्या माध्यमातून ड्रोन फोटोग्राफी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या आधारे नाल्यांचे अंतिम संरेखन निश्चित करून प्रस्तावित विकास आराखड्यात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ३० नाल्यांवर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व त्यातील २०२५ मधील सुधारित तरतुदीनुसार शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून, त्याचे अध्यक्ष म्हणून आयुक्तांना अधिकार देण्यात आले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या आढावा बैठकीत ७४ नाल्यांचा हा आराखडा व त्यावरील उपाययोजनांना अधिकृत मंजुरी देण्यात आली.
हा संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन व पर्जन्यजल नियंत्रण आराखडा, नालानिहाय सर्वेक्षण अहवाल व बैठकींचे इतिवृत्त सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, सोलापूर शहराला पूरमुक्त व सुरक्षित बनविण्याच्या दिशेने हे एक दीर्घकालीन व शाश्वत पाऊल ठरणार आहे.



