देश - विदेश

कर्तव्यपथावर ‘गणेशोत्सव’चा जागर ; महाराष्ट्राच्या चित्ररथातून आत्मनिर्भरतेचा संदेश

कर्तव्यपथावर ‘गणेशोत्सव’चा जागर ; महाराष्ट्राच्या चित्ररथातून आत्मनिर्भरतेचा संदेश

नवी दिल्ली, (२६ जानेवारी) :- देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर भव्य आणि दिमाखदार संचलन पार पडले. या राष्ट्रीय सोहळ्यात विविध राज्यांच्या चित्ररथांनी भारताची सांस्कृतिक विविधता, परंपरा आणि प्रगतीचे दर्शन घडवले. यामध्ये ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने विशेष लक्ष वेधून घेतले.

महाराष्ट्राच्या चित्ररथातून राज्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिलेला सामाजिक ऐक्याचा संदेश आणि आजच्या काळात या उत्सवातून उभी राहिलेली आर्थिक व रोजगारनिर्मितीची साखळी प्रभावीपणे सादर करण्यात आली. गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव नसून तो समाजजागृती, स्वावलंबन आणि स्थानिक उद्योगांना चालना देणारा महत्त्वाचा उत्सव असल्याचा संदेश या चित्ररथातून देण्यात आला.

चित्ररथाच्या अग्रभागी महाराष्ट्राच्या ऊर्जेचे प्रतीक असलेली ढोल वाजवणारी महिला, मध्यभागी गणपतीची मूर्ती साकारणारा मूर्तिकार, तर शेवटच्या भागात अष्टविनायक मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. या कलात्मक रचनेमुळे देश-विदेशातील प्रेक्षकांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे कौतुक केले.

चित्ररथासोबत नऊवारी साडी परिधान केलेल्या महिलांचे लेझीम पथक आणि ढोल-ताशांच्या गजराने कर्तव्यपथावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून मूर्तिकार, सजावट कलाकार, वादक, कारागीर आणि लघुउद्योगांना मिळणारा शाश्वत रोजगार आणि त्यातून साकार होणारी आत्मनिर्भरतेची संकल्पना या सादरीकरणाचे मुख्य सूत्र होते.

महाराष्ट्र शासनाने २०२५ पासून गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिल्यामुळे या चित्ररथाला यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात विशेष महत्त्व प्राप्त झाले. विविध राज्यांच्या चित्ररथांच्या मांदियाळीत महाराष्ट्राच्या चित्ररथाने आपली वेगळी ओळख निर्माण करत कर्तव्यपथावर महाराष्ट्र संस्कृतीचा जयघोष केला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!