महाराष्ट्र

निवडणूक कर्तव्यात पोलिसांचा अपमान? बुथवर दोन दिवस सेवा देऊनही तुटपुंजा भत्ता

निवडणूक कर्तव्यात पोलिसांचा अपमान? बुथवर दोन दिवस सेवा देऊनही तुटपुंजा भत्ता

पोलीस अंमलदार विलास मुंढेंनी आत्मसन्मानार्थ नाकारला भत्ता

मुंबई (प्रतिनिधी ):- निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या आर्थिक अन्यायाचा पुन्हा एकदा संतापजनक प्रकार समोर आला आहे. निवडणूक काळात बुथवर दोन दिवस मुक्कामी सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना मिळणारा अत्यंत तुटपुंजा भत्ता हा त्यांच्या मेहनतीचा आणि जोखमीच्या कर्तव्याचा सरळ अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, निवडणूक कर्तव्यावर असलेल्या विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पदांनुसार भत्ते देण्यात आले असताना, पोलिस कर्मचाऱ्यांना केवळ ५०० रुपये इतकी नाममात्र रक्कम देण्यात आली. दुसरीकडे, एका मतासाठी हजारो ते दहा-दहा हजार रुपयांचे रेट लावणाऱ्या राजकीय पक्षांच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना दिला जाणारा हा भत्ता अत्यंत अपमानास्पद असल्याचा आरोप होत आहे.

या अन्यायाविरोधात पोलीस अंमलदार विलास मुंढे यांनी एक ठाम आणि आत्मसन्मानाचा निर्णय घेतला. दोन दिवस बुथवर मुक्कामी राहून निवडणूक कर्तव्य बजावल्यानंतर, शिपायापेक्षाही कमी रक्कम देण्यात येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी हा निवडणूक भत्ता स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, “हा केवळ भत्ता नाकारणे नसून संपूर्ण यंत्रणेला दिलेला आरसा आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

निवडणूक काळात पोलिस कर्मचाऱ्यांना दीर्घ तास ताणतणावाखाली काम करावे लागते. कायदा व सुव्यवस्था, मतदानाची सुरक्षितता, वाद टाळणे आणि नागरिकांचा विश्वास राखणे ही मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. मात्र, या जबाबदारीच्या मोबदल्यात दिला जाणारा भत्ता त्यांच्या कष्टांच्या तुलनेत अत्यंत तोकडा असल्याने, “पोलिसांवर आर्थिक बाबतीत अजून किती अन्याय करणार?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेत पोलिस कर्मचाऱ्यांच्या मानधन व सुविधांबाबत पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. शासन आणि निवडणूक प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन, पोलिसांच्या कर्तव्याचा सन्मान राखेल असा न्याय्य भत्ता निश्चित करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!