शासकीय नोकरी मिळवणे होणार जलद; निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

शासकीय नोकरी मिळवणे होणार जलद; निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
मुंबई (प्रतिनिधी):-
राज्यातील शासकीय सेवांमध्ये भरती प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि नागरिक-केंद्रित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. विविध पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर केवळ चार दिवसांच्या आत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात यावे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
सुशासनासाठी प्रशासकीय सुधारणा (गुड गव्हर्नन्स री-इंजिनियरिंग) याबाबत वर्षा निवासस्थानी झालेल्या सादरीकरणावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीत त्यांनी दरवर्षी जानेवारी महिना संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींच्या ७५ टक्के जागांवर पदोन्नती देण्याचे निर्देशही दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,
“राज्यात नागरिक-केंद्रित, जबाबदार आणि सुशासकीय व्यवस्था उभारण्यासाठी प्रशासकीय सुधारणा अत्यावश्यक आहेत. प्रत्येक विभागाने यात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या कार्यक्षमतेची छाप उमटवावी.”
मुख्यमंत्र्यांचे प्रमुख निर्देश
शासकीय परीक्षेचे निकाल लागल्यानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्र
जानेवारीपर्यंत ७५ टक्के पदोन्नती प्रक्रिया पूर्ण
मागे पडलेले विभागांनी कार्यवाहीला गती द्यावी
रिक्त पदांच्या संख्येनुसार विभागांनी मागणीपत्र सादर करावे
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण व क्षमता वृद्धी
नागरिकांना सर्व सेवांचा सहज, जलद लाभ मिळण्यासाठी ‘आपले सरकार 2.0’ पोर्टल कार्यान्वित
राज्यातील आपले सरकार केंद्र व सेतू केंद्रांचे सक्षमीकरण
या महत्त्वपूर्ण बैठकीतअप्पर मुख्य सचिव (सेवा) व्ही.राधा,समग्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल ,मुख्य सचिव राजेश कुमार,अपर मुख्य सचिव (प्रशासकीय सुधारणा) राजेश अग्रवाल,अपर मुख्य सचिव (गृह) इकबाल सिंह चहल,
अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर,
अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी,
अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे
यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते.
राज्यातील प्रशासकीय सुधारणा आणि सेवांचे डिजिटायझेशन यामुळे नियुक्ती प्रक्रिया, पदोन्नती आणि नागरिकसेवा यांना मोठी गती मिळणार असून, सुशासनाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.



