Prabuddha Raj

Latest Marathi News

श्री सिद्धेश्वर महायात्रेसाठी सोलापुरात कडक वाहतूक निर्बंध; १२ ते १६ जानेवारीदरम्यान नो पार्किंग व नो व्हेईकल झोन

Oplus_16908288

श्री सिद्धेश्वर महायात्रेसाठी सोलापुरात कडक वाहतूक निर्बंध; १२ ते १६ जानेवारीदरम्यान नो पार्किंग व नो व्हेईकल झोन

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्वर महाराज यांच्या परंपरागत मुख्य महायात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चार स्वतंत्र जाहीरनाम्यांद्वारे कडक वाहतूक व पार्किंग निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ही महायात्रा दि. १२ जानेवारी ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यांतून अंदाजे ३ ते ४ लाख भाविक सोलापूर शहरात दाखल होतात. याच कालावधीत नंदीध्वजाची भव्य मिरवणूक, अक्षता सोहळा, होम विधी, ६८ लिंग प्रदक्षिणा तसेच जनावरांचा मोठा बाजार भरत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

Oplus_16908288

*प्रमुख धार्मिक स्थळांवर “नो पार्किंग झोन”*

पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१)(ब) अन्वये दिलेल्या आदेशानुसार, दि. १२ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत पुढील ठिकाणी नो पार्किंग झोन लागू राहणार आहे:

* श्री. सिद्धेश्वर मंदिर परिसर
* श्री. मल्लिकार्जुन मंदिर
* संमत्ती कट्टा परिसर
* श्री. रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसर
* जनावर बाजार परिसर

तसेच होम मैदान परिसरात

* १४ जानेवारी (होम विधी)
* १५ जानेवारी (शोभेचे दारुकाम)

या कालावधीत संपूर्ण नो पार्किंग झोन राहील.

*अक्षता सोहळ्याच्या दिवशी ‘नो व्हेईकल झोन’*

दि. १३ जानेवारी २०२६ (अक्षता सोहळा)

* सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत

खालील परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश पूर्णतः बंद राहील

* श्री. सिद्धेश्वर मंदिर परिसर
* फडकुले सभागृह ते डफरिन हॉस्पिटल
* पार्क चौक ते मार्केट पोलीस चौकी
* हरीभाई देवकरण प्रशाला ते मार्केट पोलीस चौकी
* होम मैदान परिसर

या दिवशी भाविकांनी मंदिरात जाण्यासाठी संमत्ती कट्टा उतार मार्गाचा व बाहेर पडण्यासाठी महाद्वार व विष्णू घाट मार्गाचा वापर करावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

*नंदीध्वज मिरवणूक मार्गावर वाहतूक बंद*

दि. १२ ते १६ जानेवारी २०२६ दरम्यान नंदीध्वज मिरवणूक ज्या-ज्या मार्गावरून जाईल त्या मार्गावर तात्पुरती वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

*प्रमुख मिरवणूक मार्ग :*

* हिरेहब्बु मठ
* कसबा चौक – माणिक चौक
* विजापूर वेस – पंचकट्टा
* रिपन हॉल – संमत्ती कट्टा
* डफरिन चौक – रेल्वे स्टेशन
* एस.टी. स्टँड – सम्राट चौक
* बाळीवेस – ६८ लिंग प्रदक्षिणा मार्ग

मिरवणूक पुढे सरकत जाईल त्यानुसार संबंधित मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात येणार आहे.

खालील वाहनांना सर्व निर्बंधांतून वगळण्यात आले आहे

रुग्णवाहिका
अग्निशामक दल
पोलीस वाहने
लष्कर, नौदल, हवाई दल
पॅरामिलिटरी फोर्स
VVIP व संरक्षित व्यक्तींची वाहने
पोलिसांची विशेष परवानगी असलेली वाहने

या सर्व आदेशांचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिला आहे.

*पोलिसांचे नागरिकांना आवाहन*

सोलापूरकर नागरिक व भाविकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करून श्री. सिद्धेश्वर महायात्रा शांततेत व सुरक्षिततेत पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सोलापूर शहर पोलिसांनी केले आहे.