सिद्धेश्वर महायात्रा नियोजन बैठकीस महापालिका अधिकारी गैरहजर; जिल्हाधिकाऱ्यांच्या नाराजीनंतर बैठक रद्द
सिद्धेश्वर महायात्रा नियोजन बैठकीस महापालिका अधिकारी गैरहजर; जिल्हाधिकाऱ्यांच्या नाराजीनंतर बैठक रद्द
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांच्या महायात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण नियोजन बैठकीकडे सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी उपस्थित न राहिल्याने अखेर ही बैठक रद्द करण्यात आली.
श्री सिद्धेश्वर महायात्रा (गड्डा यात्रा) १२ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत गुरुवारी (दि. ८) दुपारी ३ वाजता नियोजन भवन सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र बैठक सुरू होऊन अर्धा तास उलटूनही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच इन्सिडेंट कमांडर तथा नगर अभियंता श्रीमती सारिका आकुलवार यांच्यासह कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित झाला नाही.
या प्रकारामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी महापालिकेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यात्रेसारख्या मोठ्या आणि संवेदनशील धार्मिक कार्यक्रमाच्या नियोजनात महापालिकेने दाखवलेला निष्काळजीपणा गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. परिणामी, आजची बैठक रद्द करण्याचे आदेश देत या संदर्भातील सविस्तर अहवाल राज्याचे मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (गृह) तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक यांना तत्काळ पाठवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आणि श्री सिद्धेश्वर मंदिर समितीच्या पंच कमिटीचे पंच उपस्थित होते. मात्र यात्रेच्या व्यवस्थापनाची प्रमुख जबाबदारी असलेल्या सोलापूर महापालिकेचे अधिकारी आणि इन्सिडेंट कमांडर अनुपस्थित राहिल्याने प्रशासनात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्री सिद्धेश्वर महायात्रेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा, स्वच्छता व सुविधा यांचे काटेकोर नियोजन आवश्यक असताना महापालिकेने दाखवलेली उदासीनता अत्यंत चुकीची असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा अहवाल उच्चस्तरावर पाठवण्यात येणार असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर पुढील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



