श्री सिद्धरामेश्वर यात्रेसाठी महापालिका सज्ज ; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासेंकडून मिरवणूक मार्ग व होम मैदानाची पाहणी

श्री सिद्धरामेश्वर यात्रेसाठी महापालिका सज्ज ; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासेंकडून मिरवणूक मार्ग व होम मैदानाची पाहणी
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहराची ओळख असलेली आणि भाविकांच्या अपार श्रद्धेने साजरी होणारी श्री सिद्धरामेश्वर यात्रा सुरळीत, सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी सोलापूर महानगरपालिकेने तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज यात्रेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होम मैदान तसेच नंदी ध्वज मिरवणूक मार्गाची सखोल पाहणी केली.

या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, राजशेखर हिरेहब्बू, नगर अभियंता सारिका आकूलवर, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, तसेच मनोज जाधव, सागर करोसेकर आदी अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी प्रत्यक्ष मैदानावर जाऊन तयारीचा आढावा घेत विविध विभागांना तातडीच्या व ठोस सूचना दिल्या.
मिरवणूक मार्गावर उंच नंदी ध्वज व मिरवणुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तात्काळ कापण्याचे आदेश देण्यात आले. तसेच लटकणाऱ्या केबल वायर, दूरध्वनी व विद्युत तारा सुरक्षितरीत्या दुरुस्त अथवा हलविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. यात्रेदरम्यान विशेषतः रात्रीच्या वेळी भाविकांना अडचण येऊ नये, यासाठी एलईडी लाईट्ससह अतिरिक्त प्रकाश व्यवस्था उभारण्याचे आणि बंद असलेल्या लाईट्स त्वरित दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय मिरवणूक मार्गावरील खड्डे, रस्त्यांची दुरवस्था तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देत भाविक, वाहनचालक व सहभागी यांची सुरक्षितता प्राधान्याने पाहण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
होम मैदान परिसरात होणाऱ्या धार्मिक विधी व कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, तात्पुरती शौचालये, विद्युत पुरवठा, आरोग्य सुविधा व अग्निशमन यंत्रणेची सज्जता यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध राहील, याची खात्री करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

यात्रेचे नियोजन यशस्वी करण्यासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत, उद्यान, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, अग्निशमन दल, वाहतूक पोलिस व पोलीस प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले.
सोलापूर महानगरपालिका श्री सिद्धरामेश्वर यात्रेसाठी सर्वतोपरी तयारी करत असून, भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.




