हैदराबाद रोडवरील पर्जन्य जलवाहिनीत ड्रेनेज पाणी मिसळल्याने धोका; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासेंची थेट पाहणी व कडक सूचना

हैदराबाद रोडवरील पर्जन्य जलवाहिनीत ड्रेनेज पाणी मिसळल्याने धोका; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासेंची थेट पाहणी व कडक सूचना
सोलापूर (प्रतिनिधी):- शहरातील पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज हैदराबाद रोड परिसरातील सुरू असलेल्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. विडी घरकुल भागातील नाला क्रमांक २० (पोगुल विहार ते हैदराबाद रोड) आणि नाला क्रमांक २१ (हैदराबाद रोड ते आदर्श नगर) या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची त्यांनी सखोल तपासणी केली.

या पर्जन्य जलवाहिनीचे काम सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर)नुसार सुरू असून, त्यामध्ये नाल्यांचे योग्य प्रकारे ट्रेनिंग करणे, काही ठिकाणी नाले बंदिस्त करणे तसेच आवश्यक भागात पाईपलाईन टाकण्याची कामे करण्यात येत आहेत. ही जलवाहिनी प्रामुख्याने पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये पावसाचे पाणी सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी उभारण्यात येत आहे.

मात्र पाहणीदरम्यान काही भागात पर्जन्य जलवाहिनीमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळून ते वर्षभर वाहत असल्याचे निदर्शनास आले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी पर्जन्य जलवाहिनीमध्ये ड्रेनेजचे पाणी सोडणे हे नियमबाह्य व आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे असल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकारामुळे पावसाळ्यात नाले ओसंडून वाहतात, परिणामी सखल भागात पाणी साचते तसेच आजूबाजूच्या वसाहती व झोपडपट्टी भागात पाणी शिरण्याच्या घटना घडतात, असे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पर्जन्य जलवाहिनी आणि ड्रेनेज व्यवस्था यांची स्पष्टपणे वेगळी मांडणी करण्यात यावी, तसेच भविष्यात शहरातील पूरस्थिती आणि पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी नियोजनबद्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने काम राबवावे, असे निर्देश त्यांनी दिले.

या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, एन्व्हायरोसेफ कन्सल्टंटचे टीम लीडर गोकुळ चितारी यांच्यासह हर्षवर्धन बुबणे, रेसिडेंट इंजिनिअर चंद्रकांत गुंडे, रोहन तोगरे, रोहित गोडगे, प्रोजेक्ट मॅनेजर सचिन लकारे, साईट इंजिनिअर चरणू शिंदे, राहुल यातकर, मनोज जाधव, सागर करोसेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




