स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज व पुस्तके सादर करण्याचे आवाहन

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज व पुस्तके सादर करण्याचे आवाहन
सोलापूर (जिमाका) :- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार – २०२५ साठी लेखक व प्रकाशकांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज व पुस्तके १ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील प्रथम आवृत्तीच्या पुस्तकांनाच पात्रता राहणार आहे. राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यांतील लेखक व प्रकाशकांना संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तर मुंबई शहर व उपनगरातील लेखक व प्रकाशकांना थेट महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे प्रवेशिका सादर कराव्या लागणार आहेत.
या स्पर्धेची सविस्तर नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, प्रभादेवी, मुंबई येथे विनामूल्य उपलब्ध असून, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण किंवा करमणूक शाखेतूनही (मुंबई शहर व उपनगर वगळता) मिळू शकतील.
याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार २०२५’ संदर्भातील नियमपुस्तिका व प्रवेशिका ऑनलाइन स्वरूपातही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लेखक किंवा प्रकाशकांनी प्रवेशिका पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रांसह आणि पुस्तकांच्या प्रतींसह निर्धारित कालावधीत संबंधित कार्यालयात पोहोचतील, याची दक्षता घ्यावी. मुंबई शहर व उपनगरातील लेखक/प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह प्रवेशिका थेट मंडळाकडे पाठवाव्यात, तर अन्य जिल्ह्यांतील लेखक/प्रकाशकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अर्ज सादर करावेत.
प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. ३० जानेवारी २०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.




