आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; वारकरी सेवेत कोणतीही त्रुटी राहू देणार नाही – विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
आषाढी एकादशीपूर्वी पालखी मार्ग आणि तळांवरील सर्व कामे पूर्ण करा; अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; वारकरी सेवेत कोणतीही त्रुटी राहू देणार नाही – विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
आषाढी एकादशीपूर्वी पालखी मार्ग आणि तळांवरील सर्व कामे पूर्ण करा; अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२५ रोजी होत असून राज्यभरातून लाखो वारकरी, भाविक आणि दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा स्थळे आणि रिंगण सोहळा परिसरात पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा, वीज व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिल्या.
आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव आणि वाखरी येथील पालखी तळांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागांना विविध कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा नगर विकास प्रशासन अधिकारी योगेश डोके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
*पालखी मार्गावरील कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश*
विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, पालखी तळांचे मुरूमीकरण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीज व्यवस्था आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पालखी तळांवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याबरोबरच हायमास्ट दिव्यांची संख्या वाढविण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

नातेपुते येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळासाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्यास सांगण्यात आले. वाढत्या वारकरी संख्येचा विचार करून भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्यावरही भर देण्यात आला.
भंडीशेगाव येथे संत सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी नव्याने उपलब्ध झालेल्या पालखी तळाची पाहणी करताना विभागीय आयुक्तांनी जलसंपदा विभागाच्या जुन्या इमारती हटवून संपूर्ण परिसर सपाट व सुयोग्य करण्याचे आदेश दिले. हे काम ३० जूनपूर्वी पूर्ण करून पालखी तळ स्वच्छ, सुरक्षित आणि वारकऱ्यांसाठी उपयुक्त बनविण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच आवश्यक त्या सर्व ठिकाणी शौचालये, स्नानगृहे आणि अन्य मूलभूत सुविधा उभारण्यास सांगण्यात आले.
वारी कालावधीत लाखो भाविक येणार असल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले. वैद्यकीय पथकांसह तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी केली.
जिल्हा परिषदेमार्फत महिला वारकऱ्यांसाठी हिरकणी कक्ष, विश्रांती कक्ष, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
सध्या प्रशासनाकडून ६५ एकर परिसरात विविध दिंड्यांना जागा उपलब्ध करून दिली जाते. मात्र दरवर्षी दिंड्या आणि वारकऱ्यांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध जागा अपुरी पडत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विश्वस्त योगी निरंजन दास आणि पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी पालखी तळासाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्याची तसेच जर्मन हँगरची संख्या वाढविण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी पालखी सोहळा प्रमुखांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य देण्यात येत असून बहुतेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे सांगितले. पालखी सोहळे जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर सर्व वारकरी आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पाहणी दौऱ्यादरम्यान विभागीय आयुक्तांनी मंदिर जतन व संवर्धन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आराखड्यांतर्गत पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या कामांची माहिती सादर केली.
“वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा असून, आषाढी वारीदरम्यान प्रत्येक भाविकाला सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा मिळाल्या पाहिजेत,” असा स्पष्ट संदेश विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी प्रशासनाला दिला.



