अध्यक्ष दीपक वैद्य यांचा जिल्हा परिषदेत धडक अॅक्शन मोड; सभापती संस्कृती सातपुते यांनी मांडले समाजकल्याण विभागाचे प्रश्न

अध्यक्ष दीपक वैद्य यांचा जिल्हा परिषदेत धडक अॅक्शन मोड; सभापती संस्कृती सातपुते यांनी मांडले समाजकल्याण विभागाचे प्रश्न
आंबेडकर वाचनालयासाठी वाढीव निधीची मागणी, ढासळत्या इमारतींच्या दुरुस्तीचा मुद्दा आणि कर्मचारी वाढीचा प्रस्ताव
सोलापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी शुक्रवारी समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची अचानक पाहणी करून प्रशासनाला सजगतेचा इशारा दिला. या पाहणीदरम्यान दोन्ही पदाधिकाऱ्यांनी विभागातील कामकाजाचा आढावा घेत विविध प्रश्नांवर तातडीने लक्ष वेधले.

समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या विकासासाठी आणि सुविधा वाढीसाठी विशेष निधीची आवश्यकता असल्याचे सांगत वाढीव निधीचा प्रस्ताव अध्यक्ष दीपक वैद्य यांच्याकडे सादर केला. तसेच समाजकल्याण विभागाच्या इमारती व परिसरातील काही संरचना ढासळलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने अनेक कामांवर परिणाम होत असल्याचे सांगत सातपुते यांनी अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. समाजकल्याण विभाग अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अध्यक्ष दीपक वैद्य यांनी महिला व बालकल्याण विभागात प्रत्यक्ष उपस्थिती नोंदवही आणि हालचाल रजिस्टरची तपासणी केली. कोणते कर्मचारी उपस्थित आहेत, कोण अनुपस्थित आहेत तसेच कार्यालयीन वेळेत बाहेर गेलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती त्यांनी घेतली. जे कर्मचारी कार्यालयीन वेळेत बाहेर गेले आहेत, त्यांनी परत आल्यानंतर त्यांना माझ्या कार्यालयात पाठवावे, असे स्पष्ट निर्देश अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या पाहणीदरम्यान महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्या शांभवी कल्याणशेट्टी तसेच महिला व बालकल्याण व समाजकल्याण विभागाचे प्रसाद मिरकले उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत नागरिकांना अधिक चांगल्या सेवा कशा देता येतील याबाबत चर्चा केली.
अचानक पाहणी, विभागीय प्रश्नांवर थेट हस्तक्षेप आणि प्रशासनावरील बारीक नजर यामुळे अध्यक्ष दीपक वैद्य आणि सभापती संस्कृती सातपुते यांच्या सक्रिय कार्यशैलीची जिल्हा परिषद वर्तुळात विशेष चर्चा रंगली आहे. समाजकल्याण विभागातील पायाभूत सुविधा, कर्मचारी प्रश्न आणि वाचनालय विकासासाठी त्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका लक्षवेधी ठरली.



