सोलापूर

सोलापुरात पत्रकार दिन उत्साहात साजरा; आदर्श पत्रकार पुरस्कारांचे वितरण………पत्रकार समाजाचा तिसरा डोळा; शब्दांचा वापर जपून करावा – डॉ. शिवाजी शिंदे

सोलापुरात पत्रकार दिन उत्साहात साजरा; आदर्श पत्रकार पुरस्कारांचे वितरण………पत्रकार समाजाचा तिसरा डोळा; शब्दांचा वापर जपून करावा – डॉ. शिवाजी शिंदे

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर तसेच ज्येष्ठ पत्रकार कै. रंगा अण्णा वैद्य यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आली.


कार्यक्रमाचे स्वागत पुरस्कार निवड समितीचे सदस्य अय्यूब अहमद (नल्लामंदू) यांनी उर्दू शायरीसह केले. संघाचे सचिव प्रा. पी. पी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करत संघाचा वार्षिक अहवाल सादर केला. अध्यक्ष अशोक मठपती व सहसचिव अबुबकर नल्लामंदू यांनी मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.
यावेळी विविध ज्येष्ठ पत्रकारांच्या स्मरणार्थ देण्यात येणारे “आदर्श पत्रकार पुरस्कार” प्रदान करण्यात आले.

कै. रंगा अण्णा वैद्य यांच्या स्मरणार्थ दै. सुराज्यचे उपसंपादक पुरुषोत्तम कुलकर्णी,
कै. अ. लतीफ नल्लामंदू (कासिदकार) यांच्या स्मरणार्थ दै. लोकमतचे उपसंपादक अप्पा पाटील,
बार्शी येथील ज्येष्ठ संपादक कै. बाबुराव मठपती यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनचे वार्ताहर इरफान शेख,
तर कै. मारुती सोनावणे यांच्या स्मरणार्थ दै. संचारचे माढा प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार दिलीप गोसावी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कै. रंगा अण्णा वैद्य सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलसचिव (रजिस्ट्रार) डॉ. शिवाजी शिंदे, तसेच पुरस्कार निवड समितीचे सदस्य अय्यूब नल्लामंदू यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारप्राप्त पत्रकारांना गौरवपत्र, पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रमुख पाहुणे डॉ. शिवाजी शिंदे यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की,
“प्रिंट मीडिया असो वा इलेक्ट्रॉनिक मीडिया, पत्रकारांनी समाजात सकारात्मक विचारांची पेरणी केली पाहिजे. शब्दांमध्ये मोठी ताकद असते. शब्दांचा वापर जपून केल्यासच समाजाचे योग्य प्रबोधन होईल. पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा आहे आणि हा डोळा नेहमी स्वच्छ असला पाहिजे.”

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी बाळशास्त्री जांभेकरांची स्वच्छ पत्रकारितेची परंपरा आत्मसात करण्याचे आवाहन केले. पत्रकारांनी समाजातील सार्वजनिक प्रश्न निर्भीडपणे मांडून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात गाढे अभ्यासक योगेश तुरेराव यांनी आर.एन.आय.च्या नवीन नियम व तरतुदींबाबत उपस्थित पत्रकारांना सविस्तर मार्गदर्शन केले.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून श्रीशैल चिंचोळीकर, विश्वनाथ व्हनकोरे, डॉ. शफी चोबदार, प्रशांत जोशी, विजयकुमार जुंजा, नागेश दांतकाळे, इक्बाल बागबान, बाळासाहेब वाघमोडे, सुदर्शन तेलंग, देविदास उत्पात, इम्तियाज काजी, नागेश कुलकर्णी, ॲड. काटूळे, माजी नगरसेविका मोहिनी पत्की, दशरथ वडतिले, पद्माकर कुलकर्णी, सीए आनंद करवंदे, धनंजय कुलकर्णी, शौकत काझी, मजहर अल्लोळी, वसंत चौधरी आदी मान्यवरांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ पत्रकार दिलीप गोसावी व पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी स्वर्गीय पत्रकार रंगा अण्णा वैद्य, बाबुराव जवकल, नल्लामंदू व रमेश महामुनी यांच्या आठवणींना उजाळा देत संघाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देविदास उत्पात यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुराणा यांनी मानले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!