मुख्यमंत्री समृद्ध गाव अभियानात गुळवंचीची भरीव कामगिरी; सिईओ जंगम यांचे प्रत्यक्ष श्रमदान

मुख्यमंत्री समृद्ध गाव अभियानात गुळवंचीची भरीव कामगिरी; सिईओ जंगम यांचे प्रत्यक्ष श्रमदान
सोलापूर (प्रतिनिधी):- मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायतराज अभियानाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कुलदीप जंगम यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची ग्रामपंचायतीस भेट देऊन अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध कामकाजाचे व लोकसहभागातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.

या भेटीदरम्यान केवळ पाहणीपुरते न थांबता मा. सीईओ कुलदीप जंगम यांनी स्वतः फावडे हातात घेऊन वृक्षारोपण करत प्रत्यक्ष श्रमदान केले. अधिकाऱ्यांनी स्वतः कामात सहभागी होऊन ग्रामस्थांसमोर आदर्श ठेवावा, असा संदेश त्यांनी या कृतीतून दिला. त्यांच्या या सहभागामुळे उपस्थित ग्रामस्थ, कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
अभियानात अधिक गुण मिळवून स्पर्धात्मक स्तरावर गावाचा नावलौकिक वाढवण्यासाठी ग्रामपंचायत, प्रशासन व ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामपंचायतीकडून करण्यात येणारी कर वसुली वाढवणे, थकीत वीजबिलांचा निपटारा, जिल्हा परिषद शाळेची देखभाल व दुरुस्ती, शाळा व गाव परिसरात सीसीटीव्ही बसवणे, तसेच लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी उभारणी करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
गावातील शाळा परिसरात साकारलेल्या बोलक्या भिंती, रस्त्यांच्या दुतर्फा करण्यात आलेली वृक्षलागवड, अंगणवाड्यांसाठी उभारण्यात आलेली बेबी टॉयलेट सुविधा, तसेच व्हर्टिकल पद्धतीने विकसित केलेली नाविन्यपूर्ण परसबाग या उपक्रमांची त्यांनी विशेष दखल घेतली. या उपक्रमांमुळे शिक्षण, आरोग्य व पर्यावरण संवर्धनाला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या भेटीदरम्यान गटविकास अधिकारी श्री. राजाराम भोंग, विस्तार अधिकारी तथा पालक अधिकारी श्री. सोमनाथ शिंदे, सरपंच श्री. सुनील जाधव, उपसरपंच श्रीम. तांबे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. मीनाक्षी सरवदे, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.




