सोलापूर

आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हलले; निलंबित सफाई कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्नियुक्ती

आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हलले; निलंबित सफाई कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्नियुक्ती

मैंदर्गी (प्रतिनिधी) :- मैंदर्गी नगरपरिषदेत कार्यरत सफाई कर्मचारी श्रीधर शरणप्पा मनिकडे यांना सेवेत पुनर्नियुक्त करण्याचे आदेश अखेर प्रशासनाने दिले आहेत. विशेष म्हणजे, आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतरच हे आदेश निर्गमित झाल्याने या प्रकरणाला गंभीर व संवेदनशील वळण मिळाले आहे.

जन्म–मृत्यू विभागामार्फत जिवंत व्यक्तीस मृत्यू दाखला दिल्याच्या आरोपावरून श्रीधर मनिकडे यांना दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर विभागीय चौकशीसाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली होती. सदर चौकशी समितीने दिनांक ८ ऑगस्ट २०२४ रोजी आपला अहवाल सादर केला.

चौकशी अहवालानुसार, श्रीधर मनिकडे यांच्यावर ठेवण्यात आलेल्या चार आरोपांपैकी तीन आरोप सिद्ध झाले नाहीत, तर एका आरोपामध्ये केवळ १५० रुपयांची रक्कम भरणा न केल्याचे नमूद करण्यात आले. यानंतर मनिकडे यांनी चौकशी अहवाल स्वीकारून, एकदाच क्षमादान देत सेवेत पुनर्नियुक्त करण्याची विनंती केली होती.

तथापि, प्रदीर्घ काळ निर्णय न झाल्याने व आर्थिक–मानसिक तणाव वाढल्याने श्रीधर मनिकडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला, अशी माहिती समोर आली आहे. या इशाऱ्यानंतर प्रशासनावर दबाव वाढला आणि अखेर मुख्याधिकारी अर्जुन सुरवसे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत अधिकारांचा वापर करत पुनर्नियुक्तीचे आदेश दिले.

Oplus_16908288

आदेशानुसार, श्रीधर मनिकडे यांच्याकडून १५० रुपये व महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ मधील कलम ७९ नुसार ५०० रुपये असा एकूण ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच, निलंबनाचा संपूर्ण कालावधी हा सेवाकाळ समजून त्या कालावधीतील वेतन अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या FIR च्या अंतिम निकालाच्या अधीन ही पुनर्नियुक्ती राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ही घटना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या न्यायप्रक्रियेवर व प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे. आत्मदहनासारख्या टोकाच्या इशाऱ्याशिवाय कर्मचाऱ्याला न्याय मिळू शकत नसेल, तर यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर पुनर्विचाराची गरज असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!