महानगरपालिका निवडणुकीत खर्चावर ‘वॉच’… उमेदवारांची कसोटी सुरू

महानगरपालिका निवडणुकीत खर्चावर ‘वॉच’… उमेदवारांची कसोटी सुरू
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचार खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून, यासाठी निवडणूक खर्च समितीची स्थापना करण्यात आली आहे. या अनुषंगाने राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच त्यांच्या अधिकृत खर्च प्रतिनिधींसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण बैठक सोलापूर महानगरपालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस मुख्य लेखापरीक्षक सदानंद वाघमोडे, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्य लेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रचार खर्च नोंदवण्याची प्रक्रिया, नियम व जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर माहिती दिली.

निवडणूक अर्ज दाखल केल्यापासून ते १६ जानेवारीपर्यंतचा संपूर्ण प्रचार खर्च दररोज खर्च नोंदवहीत नोंदवून निवडणूक खर्च समितीकडे सादर करणे बंधनकारक असल्याचे डॉ. जवळगेकर यांनी स्पष्ट केले. खर्चाची पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक खर्चाची योग्य नोंद, मूळ पावत्या आणि बँक व्यवहारांची माहिती आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ८ जानेवारी व १२ जानेवारी रोजी उमेदवारांच्या खर्चाची अधिकृत तपासणी करण्यात येणार असून, या वेळी उमेदवारांनी प्रचार खर्चाशी संबंधित बँक स्टेटमेंट, मूळ पावत्या व इतर कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहणार आहे. प्रचार सभांसाठी वाहनांचा वापर, जाहिराती, बॅनर-पोस्टर, भित्तीपत्रके तसेच सोशल मीडियावरील प्रचार खर्च यांचाही तपशील नोंदवणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
या बैठकीदरम्यान खर्च नोंदवही भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रांची यादी तसेच खर्च निरीक्षकांकडून होणाऱ्या तपासणी प्रक्रियेबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक खर्चासंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित उमेदवारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.
या प्रशिक्षण बैठकीस विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार तसेच त्यांचे अधिकृत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.




