निलंबन रद्द न झाल्यास आत्मदहनाचा इशारा; मैंदर्गी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्याचा गंभीर आरोप
निलंबन रद्द न झाल्यास आत्मदहनाचा इशारा; मैंदर्गी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्याचा गंभीर आरोप
सोलापूर (प्रतिनिधी):- मैंदर्गी नगरपरिषदेतील जन्म-मृत्यू विभागात कार्यरत असलेले कर्मचारी श्रीधर मनिकडे यांनी निलंबनाची कारवाई तात्काळ रद्द न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी ही माहिती आज सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

श्रीधर मनिकडे यांच्यावर जिवंत व्यक्तीच्या नावावर मृत्यू दाखला जारी केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी नगरपरिषद प्रशासनाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत निलंबन केले होते. मात्र, सदर प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आपण दोषमुक्त ठरलो असल्याचा दावा मनिकडे यांनी केला आहे.
चौकशी अहवालात आपल्यावर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नसतानाही अद्याप निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने आपण टोकाचा निर्णय घेण्यास भाग पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“चौकशीत दोषमुक्त झाल्यानंतरही कारवाई कायम ठेवणे अन्यायकारक आहे. प्रशासनाकडून हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी मैंदर्गी नगरपरिषद कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे,” असा गंभीर इशारा श्रीधर मनिकडे यांनी दिला.
या प्रकरणामुळे नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, कर्मचारी वर्गातही तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



