अक्कलकोटमध्ये २२ वर्षीय तरुणीची हत्या; प्रेमप्रकरणातून प्रकार, आरोपीची आत्महत्येचा प्रयत्न
अक्कलकोटमध्ये २२ वर्षीय तरुणीची हत्या; प्रेमप्रकरणातून प्रकार, आरोपीची आत्महत्येचा प्रयत्न
अक्कलकोट (प्रतिनिधी):- अक्कलकोट शहरात आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली असून सोलापूर येथील २२ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. स्नेहल श्रीकांत बनसोडे (वय २२, रा. रामवाडी, सोलापूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
स्नेहल ही सध्या शिक्षणासाठी आपल्या आजोळी, मामाकडे मैंदर्गी येथे वास्तव्यास होती. आरोपी युवकासोबत ती अक्कलकोट येथील एका लॉजमध्ये थांबली होती. आज दुपारी दोघांमध्ये झालेल्या वादानंतर आरोपी युवकाने लॉजच्या खोलीत स्नेहलचा गळा चिरून खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेनंतर आरोपी युवक — चव्हाण (रा. नागुर तांडा, ता. अक्कलकोट) — याने स्वतःवर धारदार शस्त्राने गंभीर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास अक्कलकोट पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तरुणीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


