आरोग्य खात्यात लाचखोरीचा पर्दाफाश; बदली प्रकरणात एसीबीचा सापळा, आरोग्य सेवक अटकेत
आरोग्य खात्यात लाचखोरीचा पर्दाफाश; बदली प्रकरणात एसीबीचा सापळा, आरोग्य सेवक अटकेत
पुणे (प्रतिनिधी):- आरोग्य उपसंचालक विभागातील एका आरोग्य सेवकाने बदली करून देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात रामकिसन गंगाधर घ्यार या आरोग्य सेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हा परिषद कार्यालयासमोर सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
तक्रारदार (वय ४१) हा आरोग्य सेवक असून, जून २०२५ मध्ये त्यांची उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर मंडळ येथून उपसंचालक कार्यालय, पुणे मंडळ येथे अंतरमंडळ बदली झाली होती. मात्र, पुणे मंडळात बदली होऊनही त्यांना अद्याप पदस्थापना मिळालेली नव्हती. प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे रिक्त असलेल्या आरोग्य सेवक पदावर नियुक्ती मिळावी, यासाठी त्यांनी विनंती अर्ज सादर केला होता.
या संदर्भात तक्रारदाराने आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची भेट घेतली असता, त्यांनी तक्रारदारास आरोपी रामकिसन घ्यार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीने संबंधित बदली करून देण्यासाठी डॉ. पवार यांच्यासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तक्रारदाराने २ डिसेंबर रोजी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने सापळा रचत आरोपी रामकिसन गंगाधर घ्यार याला रंगेहाथ अटक केली.
या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे करीत आहेत.
दरम्यान, डॉ. भगवान पवार हे यापूर्वी पुणे महापालिकेत आरोग्य अधिकारी असताना तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी वादाच्या कारणामुळे चर्चेत आले होते. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बेकायदेशीर टेंडरसाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता आरोग्य सेवकामार्फत लाच मागणीच्या आरोपामुळे ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


