महाराष्ट्र

सुयोग निवासस्थान येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा माध्यमांशी मनमोकळा संवाद

सुयोग निवासस्थान येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा माध्यमांशी मनमोकळा संवाद

नागपूर (प्रतिनिधी) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथील सुयोग निवासस्थान येथे भेट देत विविध माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला. या संवादात नागरिकांच्या हितासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी, महत्त्वाचे शासकीय निर्णय, तसेच विधिमंडळातील जुन्या आठवणी अशा अनेक विषयांवर त्यांनी मनमोकळेपणाने विचार मांडले.

यावेळी शिबिरप्रमुख प्रवीण पुरो, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सहशिबिरप्रमुख खंडूराज गायकवाड, माहिती संचालक (वृत्त) गोविंद अहंकारी यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित पत्रकारांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले असता, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट व सविस्तर उत्तरे देत शासनाची भूमिका मांडली.

सुयोग निवासस्थानाच्या इमारत सुधारणा व देखभाल संदर्भात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री पवार यांनी या विषयावर संपूर्ण व परिपूर्ण माहिती सादर करण्याचे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिले. कोणत्याही बाबतीत गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी तथ्यात्मक माहिती वेळेत माध्यमांपर्यंत पोहोचवावी, असे त्यांनी नमूद केले.

माध्यमे ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला. शासन व माध्यमांमधील समन्वय अधिक दृढ व्हावा, यासाठी अशा संवादांची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

या अनौपचारिक भेटीतून शासनाच्या कार्यपद्धतीबाबत पारदर्शकता राखण्याचा संदेश देण्यात आला असून, माध्यम प्रतिनिधींमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!