पत्राद्वारे विनंती; सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोडण्याची सचिन कल्याणशेट्टी यांची भूमिका
पत्राद्वारे विनंती; सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोडण्याची सचिन कल्याणशेट्टी यांची भूमिका
सोलापूर (प्रतिनिधी):- अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रमुख पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही विनंती करण्यात आली आहे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी १९ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवून ही भूमिका मांडली आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत सोलापूर महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकाच कालावधीत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुख आणि जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीशी संबंधित जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडताना न्याय देणे कठीण होऊ शकते.
पत्रात पुढे त्यांनी स्पष्ट केले आहे की, मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पक्षाच्या हितासाठी प्रभावी काम करण्याच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी ही विनंती आहे.
या पत्रामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, भाजपकडून पुढील काळात महापालिका निवडणुकीसाठी नवीन निवडणूक प्रमुखाची नियुक्ती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.



