सर्वांशी समन्वय ठेवून प्रामाणिकपणे काम करा–जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचा प्रशिक्षणार्थी क्लास वन अधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला

सर्वांशी समन्वय ठेवून प्रामाणिकपणे काम करा – जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचा प्रशिक्षणार्थी क्लास वन अधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला
सोलापूर (प्रतिनिधी):- शासकीय सेवेत कार्यरत असताना नागरिकांशी सद्वर्तन ठेवा, सर्वांशी समन्वय साधून काम करा आणि लोकांच्या कामासाठी प्रामाणिक रहा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी प्रशिक्षणार्थी क्लास वन अधिकाऱ्यांना केले.

जिल्हा नियोजन मंडळ येथे पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) अंतर्गत शासकीय सेवेत नुकतेच रूजू झालेले उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी, अतिरिक्त परिवहन अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी असे एकूण ३१ प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन मंडळास भेट देऊन प्रशासनाचे कामकाज जाणून घेतले.
या वेळी यशदाचे उप महासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव तसेच यशदाच्या समन्वयक रागिनी सावंत उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी “मी विकासयात्री” हे पुस्तक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना भेट दिले.

मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद म्हणाले की, लोकांप्रति आदर ठेवून आणि कामाशी एकनिष्ठ राहणाऱ्या अधिकाऱ्यांना संधी मिळते. आपण करत असलेल्या कामांचा अभ्यास करा, वेळोवेळी शासनाकडून निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयांबाबत अद्ययावत राहा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा—प्रत्येक कामात ९० टक्के उपाय असतो; नियमांच्या चौकटीत राहून तोडगा काढता येतो. कामातील आनंद, कुटुंब आणि स्वतःचे आरोग्य जपले तर जीवन यशस्वी होते. नोकरीत जबाबदारी असते; ती पार पाडताना सर्वांशी समन्वय ठेवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे आमच्यासाठी प्रेरणास्थान असून त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे काम करताना प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
यशदाचे उप महासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना, कामाला प्राधान्य द्या, सचोटीने काम करा, लोकहिताची कामे करा आणि प्रामाणिकपणा जपा, असे आवाहन केले.
दरम्यान, प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे नवे शिकायला मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.




