सोलापूर महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आढावा बैठक; कॅशलेस आरोग्य विम्याची सूचना
लाड-पागे समितीअंतर्गत ३७ जणांना नियुक्ती आदेश; आयोगाध्यक्ष डागोर यांच्या हस्ते वितरण

सोलापूर महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आढावा बैठक; कॅशलेस आरोग्य विम्याची सूचना
लाड-पागे समितीअंतर्गत ३७ जणांना नियुक्ती आदेश; आयोगाध्यक्ष डागोर यांच्या हस्ते वितरण
सोलापूर :- महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, मुंबईचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा प्राप्त मा. श्री. शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त सोलापूर महानगरपालिका येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, निवास, शिक्षण, सामाजिक सुरक्षा तसेच लाड-पागे समितीअंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार प्रलंबित प्रकरणांवर करण्यात आलेली कार्यवाही, कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि त्यावर आवश्यक उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे मा. अध्यक्ष श्री. डागोर यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना श्री. डागोर म्हणाले की, “सोलापूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने प्राधान्याने घ्यावी.” त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुविधा आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

महिला सफाई कर्मचाऱ्यांमध्ये वाढत्या आरोग्य समस्यांबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर, दम्याचा त्रास आणि इतर गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर महापालिकेअंतर्गत कार्यरत सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचा कॅशलेस आरोग्य विमा लागू करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
तसेच शासनाच्या विविध योजना आणि सुविधांचा लाभ सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. कर्मचाऱ्यांच्या मुलींना सायकली उपलब्ध करून देणे, मुलांना विविध कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवणे आणि सामाजिक उन्नतीसाठी विशेष उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने लाड-पागे समितीअंतर्गत ३७ जागांचे वाटप करण्यात आले. शासनाच्या २०२३ च्या सुधारित शासन निर्णयानुसार उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्त्या देण्यात आल्या. यामध्ये १३ पदे कनिष्ठ श्रेणी लिपिक, २ पदे कनिष्ठ अभियंता तर उर्वरित पदे सफाई कामगार म्हणून देण्यात आली.
मा. अध्यक्ष श्री. शेरसिंग डागोर यांच्या हस्ते संबंधित उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. या भरती प्रक्रियेबद्दल त्यांनी सोलापूर महापालिकेचे विशेष कौतुक केले. तसेच लाड-पागे समितीअंतर्गत प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देत जुन्या प्रलंबित अर्जांची प्रतीक्षा यादी आणि नव्या अर्जांची प्रतीक्षा यादी स्वतंत्र ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीस सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त सोनाली यादव, मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, मुख्यलेखा परीक्षक सदानंद वाघमारे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, सहायक आयुक्त गिरीष पंडित, सहायक आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता सारिका अक्कूलवार, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी यांच्यासह कामगार नेते बाली मंडेपू, श्रीनिवास रामगल आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षिततेसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे या बैठकीकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.



