सोलापूर

सोलापूर भाजून निघाले! पारा ४४ अंशांवर; मे अखेरपर्यंत उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार

दिवसा आग, रात्री उकाडा; सोलापूरकर हैराण, महिनाअखेरीस वळवाच्या पावसाची शक्यता

सोलापूर भाजून निघाले! पारा ४४ अंशांवर; मे अखेरपर्यंत उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार

दिवसा आग, रात्री उकाडा; सोलापूरकर हैराण, महिनाअखेरीस वळवाच्या पावसाची शक्यता

सोलापूर :- राज्यातील उष्ण शहरांमध्ये गणल्या जाणाऱ्या सोलापूरने यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा नवा उच्चांक गाठला आहे. रविवारी शहरातील कमाल तापमान थेट ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, रात्रीचे तापमानही २८.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेल्याने उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. दिवसाच्या प्रखर उन्हानंतर रात्रीही गरम वाऱ्यांचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.

यंदाच्या एप्रिल महिन्यापासूनच सोलापूरमध्ये तापमान सातत्याने चढत असल्याचे चित्र आहे. २७ एप्रिल रोजी ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर २ मे रोजी तापमान काहीसे खाली येत ४२.८ अंशांवर आले आणि नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा तात्पुरताच ठरला. मागील काही दिवसांत तापमानात पुन्हा झपाट्याने वाढ झाली असून आता पारा ४४ अंशांवर पोहोचला आहे.

तज्ज्ञांच्या मते, दिवसभर तीव्र उन्हामुळे जमिनीचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत उष्णता टिकून राहत आहे. शहरासह ग्रामीण भागातही उकाड्याची तीव्रता जाणवत असून, शेतकरी, बांधकाम मजूर, रस्त्यावरील विक्रेते आणि प्रवासी यांना सर्वाधिक फटका बसत आहे.

हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या अखेरपर्यंत सोलापूरमधील उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता आहे. मेच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तापमान ४४.५ ते ४५.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास जिल्ह्यात ‘उष्णतेची लाट’ जाहीर होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, महिन्याच्या अखेरीस हवामानात काहीसा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. २५ मे नंतर अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणातील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा प्रभाव वाढू शकतो. काही भागांत वळवाच्या पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, लिंबू सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी यांसारख्या द्रव पदार्थांचे सेवन करावे तसेच हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत, असा सल्ला देण्यात आला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!