मंद्रूपमध्ये काळाचा घाला; शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत
समर्थ आणि ओंकार या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; सुरक्षेअभावी ग्रामस्थांचा प्रशासनावर संताप

मंद्रूपमध्ये काळाचा घाला; शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत
समर्थ आणि ओंकार या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; सुरक्षेअभावी ग्रामस्थांचा प्रशासनावर संताप
सोलापूर (प्रतिनिधी) :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील नाईक नगर तांड्यावर शनिवारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले असून परिसरात शोककळा पसरली आहे. समर्थ मोहन चव्हाण (वय १२) आणि ओंकार रमेश चव्हाण (वय १०) अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही चिमुकल्यांची नावे आहेत.

दोघेही मंद्रूप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते. गावातील अत्यंत निरागस, खेळकर आणि सर्वांच्या लाडक्या मुलांमध्ये त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलांचे आई-वडील नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास समर्थ आणि ओंकार हे दोघे खेळत खेळत शेताजवळील तळ्याकडे गेले. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांनी शेततळ्यात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र पाण्याची खोली आणि अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.
सायंकाळी बराच वेळ मुलं घरी परतली नसल्याने पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. ग्रामस्थांनीही शोधमोहीम राबवली. दरम्यान, शेततळ्याच्या काठावर मुलांचे कपडे आणि चप्पल आढळल्याने अनर्थाची भीती व्यक्त करण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या लेकरांचे मृतदेह पाहून आई-वडिलांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. संपूर्ण नाईक नगर तांड्यावर शोकमय वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर ग्रामीण भागातील शेततळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक शेततळ्यांभोवती संरक्षण भिंत, लोखंडी जाळी किंवा इशारा फलक नसल्याने लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. विशेषतः उन्हाळ्यात मुले पोहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी अशा ठिकाणी जात असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच तसेच मंद्रूप पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. या दुर्दैवी घटनेमुळे मंद्रूप परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी पालकांनीही मुलांवर अधिक लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.



