महाराष्ट्र

दीक्षाभूमीतील विकासकामे अत्यंत संवेदनशीलतेने व मुख्यमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच करा – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

दीक्षाभूमीतील विकासकामे अत्यंत संवेदनशीलतेने व मुख्यमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच करा – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

नागपूर (प्रतिनिधी):- जागतिक पातळीवरील श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमी येथे हाती घेतली जाणारी सर्व विकासकामे अत्यंत संवेदनशीलतेने, शास्त्रीय पद्धतीने आणि स्तूपाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागेल याची पूर्ण दक्षता घेऊनच करावीत. तसेच प्रत्येक टप्प्यावर मुख्यमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच कामांचे नियोजन व अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दीक्षाभूमी येथे सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा मंत्री शिरसाट यांनी आज नागपूर येथील नियोजन भवनात घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,समाजकल्याण आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, सहसचिव सो. ना. बागुल तसेच सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री शिरसाट म्हणाले की, दीक्षाभूमी ही केवळ वास्तू नसून कोट्यवधी अनुयायांची श्रद्धा, भावना आणि ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे कोणतेही बांधकाम, सुशोभीकरण किंवा पायाभूत सुविधा विकसित करताना स्तूपाच्या संरचनात्मक सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. कामांची रचना, साहित्य, कंपन नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आदी बाबी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय निकषांनुसारच ठरवाव्यात.

आढावा बैठकीत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रस्तावित प्रकल्पांचा कालबद्ध आराखडा, भाविक व पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, पर्यावरणपूरक उपाययोजना आणि सुरक्षाव्यवस्था यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन कामांच्या टप्प्यांचे योग्य नियोजन करावे, कामांमुळे दर्शन-व्यवस्थेत अडथळा येणार नाही याची खबरदारी घ्यावी, तसेच पारदर्शकता राखून गुणवत्ता तपासणीची प्रभावी यंत्रणा उभारावी, असे निर्देशही मंत्री शिरसाट यांनी दिले.

दीक्षाभूमीच्या पवित्रतेला धक्का न लागता, तिच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाचे संवर्धन होईल, अशा पद्धतीनेच सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!