जिल्हा परिषद शाळांमध्ये महिला शिक्षकांना प्राधान्य देण्याकडे शासनाचा कल; शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची माहिती

*जिल्हा परिषद शाळांमध्ये महिला शिक्षकांना प्राधान्य देण्याकडे शासनाचा कल; शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची माहिती*
नागपूर (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्या करताना महिला शिक्षकांना प्राधान्य द्यावे, विशेषतः मुलींची संख्या अधिक असलेल्या शाळांमध्ये त्यांची नियुक्ती करण्याबाबत ग्रामविकास विभागासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.
सध्या अंमलात असलेल्या बदली धोरणात महिला शिक्षकांसाठी स्वतंत्र प्राधान्य नसून दुर्धर आजार, पती-पत्नी एकत्रीकरण, आणि उमेदवारांची पसंती हेच बदल्यांतील प्रमुख निकष आहेत. मात्र, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा विचार करून महिला शिक्षकांची उपस्थिती वाढविण्याकडे सरकार गांभीर्याने पाहत आहे.
शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी आधीच पोक्सो समिती,युवा गट,तक्रार निवारण प्रणाली यांसारख्या यंत्रणा कार्यरत असून, ज्या शाळांमध्ये महिला समुपदेशक किंवा महिला शिक्षकांची कमतरता आहे, त्या शाळांमध्ये महिला समुपदेशकांची व्यवस्था करण्यासाठी संबंधित विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन राज्यमंत्री भोयर यांनी दिले.
यावेळी त्यांनी आर्थिक बाबींवरही महत्त्वाचे मुद्दे मांडले.
२००८ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत वित्त विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच २००८ पूर्वीच्या शाळांना मिळणारे वेतनेतर अनुदान वेळेवर मिळावे, यासाठी संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये महिला शिक्षकांच्या नियुक्त्या वाढविणे, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पूरक उपाययोजना करणे आणि अनुदानाबाबतची प्रशासकीय प्रक्रिया सुकर करणे याबाबत शासन लवकरच ठोस निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



