महाराष्ट्र

“लेडी सिंघम” तहसीलदार शिल्पा ठोकडे अडचणीत; करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी विधानसभेत दाखल केला हक्कभंग प्रस्ताव

“लेडी सिंघम” तहसीलदार शिल्पा ठोकडे अडचणीत; करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी विधानसभेत दाखल केला हक्कभंग प्रस्ताव

नागपूर (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात कठोर, निर्भीड आणि निष्पक्ष कारवाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी हा प्रस्ताव सादर केला असून ठोकळे यांच्या प्रशासनिक कामकाजावर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.

तहसीलदार ठोकडे यांनी अवैध वाळूउद्योग, अतिक्रमण, महसूल अनियमितता आणि स्थानिक माफियांविरुद्ध सातत्याने धडाकेबाज कारवाई केली आहे. त्यांच्या निर्भीड भूमिकेमुळेच त्यांना “लेडी सिंघम” म्हणून जनमानसात विशेष ओळख मिळाली. महसूल विभागातील अनेक गुंतागुंतीचे वाद तातडीने निकाली काढणे, नियोजनबद्ध शासकीय कामकाज आणि शिस्तीवर भर यासाठीही त्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ देखील मिळाला आहे.

मात्र, त्यांच्या या कारवाईमुळे काही स्थानिक राजकीय व प्रशासकीय वर्तुळात नाराजी निर्माण झाल्याचे दिसत आहे. आमदार नारायण पाटील यांनी ठोकडे यांनी जनप्रतिनिधींचा अपमान केला आणि काही निर्णयांमध्ये अधिकाराचा दुरुपयोग केला, असा आरोप करत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर हिवाळी अधिवेशनात सविस्तर चर्चा होणार असून पुढील निर्णयाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या घडामोडींमुळे करमाळा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे नागरिक, सामाजिक संघटना आणि युवक ठोकडे यांच्या कारवाईला जोरदार पाठिंबा देत आहेत, तर दुसरीकडे जनप्रतिनिधींच्या आरोपांमुळे प्रशासन–राजकीय संबंधांवर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणाचा निकाल विधानसभेतील चर्चेनंतरच स्पष्ट होणार असला तरी तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्यावर दाखल झालेल्या या प्रस्तावामुळे राज्य प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!