हिवाळी अधिवेशनात भावुक वातावरण; विधानपरिषदेत दिवंगत सदस्य निर्मला ठोकळ आणि प्रकाश देवळे यांना श्रद्धांजली

हिवाळी अधिवेशनात भावुक वातावरण; विधानपरिषदेत दिवंगत सदस्य निर्मला ठोकळ आणि प्रकाश देवळे यांना श्रद्धांजली
नागपूर (प्रतिनिधी) :- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन २०२५ दरम्यान विधानपरिषदेत आजचा सत्र भावनिक वातावरणात पार पडले. विधानपरिषदेच्या दिवंगत सदस्य श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ आणि दिवंगत सदस्य प्रकाश केशवराव देवळे यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. सत्राच्या सुरुवातीला सभापती प्रा. राम शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला, यावेळी सभागृहात गंभीर शांतता पसरली होती. सभापतींनी दोन्ही दिवंगत सदस्यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाची माहिती दिली. त्यांच्या अचानक निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून सभागृहात उपस्थित सदस्यांना भावनिक केले.

शोकप्रस्तावात सभापतींनी नमूद केले की, श्रीमती निर्मला ठोकळ यांनी सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर प्रकाश देवळे यांनी कृषी, सहकार आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला.

सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, “दोन्ही मान्यवरांचे संसदसदृश योगदान, त्यांची कार्यशैली आणि लोकहिताचा विचार नेहमीच राज्यकारभारासाठी प्रेरणादायी राहील.” शोक प्रस्तावानंतर दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना आदर व्यक्त करत काही क्षण मौन पाळण्यात आले. त्यानंतर परंपरेनुसार विधानपरिषदाचे काम काही काळासाठी स्थगित करण्यात आले.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषदेतील हे श्रद्धांजली सत्र दोन्ही दिवंगत सदस्यांच्या कार्याचा गौरव करणारे ठरले. त्यांच्या आठवणी आणि कार्याचा आदर्श राज्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात कायम राहणार असल्याचे मत सभागृहाने व्यक्त केले.



