कलबुर्गी–कोल्हापूर एक्स्प्रेसला दुधनी येथे थांबा द्या – विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; फडणवीसांचा सकारात्मक प्रतिसाद
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील सोलापुरात शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दुधनी रेल्वे स्थानकावर कलबुर्गी–कोल्हापूर एक्स्प्रेसला थांबा मंजूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत, “लवकरच निर्णय घेतला जाईल”, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
दुधनी व परिसरातील विद्यार्थी सोलापूरातील विविध नामांकित महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र रेल्वे थांबा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पहाटे ३ वाजता उठून ४.३० वाजता सुटणाऱ्या मैसूर–बागलकोट पॅसेंजर गाडीने प्रवास करावा लागतो.

या प्रवासामुळे केवळ विद्यार्थी नव्हे तर घरातील आई, आजी, बहिणी यांनाही पहाटे उठून डबा तयार करावा लागतो, असा त्रास पालकांनीही व्यक्त केला.
विद्यार्थ्यांचे म्हणणे असे की, “कलबुर्गी–कोल्हापूर एक्स्प्रेस दररोज सकाळी ७.२२ वाजता दुधनी स्थानकाजवळून जाते, मात्र थांबा नसल्याने विद्यार्थ्यांना उपयुक्त सेवा असूनही तिचा लाभ मिळू शकत नाही.”
जर या गाडीला दुधनी येथे थांबा मंजूर झाला तर केवळ विद्यार्थीच नव्हे तर कामगार, नोकरदार व रोजंदारीवरील लोकांचीही मोठी सोय होईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भात विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली. त्यावर प्रतिसाद देताना फडणवीस म्हणाले “ही मागणी योग्य आहे. रेल्वे विभागाशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ.”
विद्यार्थी, पालक आणि दुधनी परिसरातील नागरिकांत या प्रतिसादामुळे समाधान आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच या निर्णयाला मान्यता मिळाल्यास दुधनी व अक्कलकोट परिसरातील प्रवाशांचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
दुधनीतील विद्यार्थ्यांची ही पुढाकारात्मक भूमिका कौतुकास्पद मानली जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी थेट सरकारी स्तरावर आवाज उठवून हक्काची सुविधा मिळवण्याचा हा प्रयत्न प्रेरणादायी ठरला आहे.



